Boris Johnson Sarkarnama
देश

धक्कादायक : लॉकडाऊनमध्येच ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरी दारू पार्टी

जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे.

सरकारनामा ब्युरो

मेक्सिको सिटी : जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे. ब्रिटनमध्ये (UK) यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर बंधने असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ई-मेल आता समोर आला आहे. जॉन्सन यांच्या सुमारे 100 मित्र आणि सहकाऱ्यांना ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये तुमची दारू तुम्हीच आणा, असे म्हटले होते. ही पार्टी पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या डाऊनिंग स्ट्रीटवरील गार्डनमध्ये झाली होती. विशेष म्हणजे देशात लॉकडाऊन असताना ही पार्टी झाली होती. ही पार्टी 2020 च्या नाताळमध्ये झाली होती. त्यावेळी देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे डाऊनिंग स्ट्रीटवर सातत्याने होणाऱ्या पार्ट्या चर्चेत आल्या आहेत.

जॉन्सन यांनी 2019 मध्ये देशात झालेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. आता त्यांनी केलेल्या पार्टीचा व्हिडीओ समोर आल्याने ते अडचणीत आले आहेत. देशात लॉकडाऊन असताना ते पार्टी करीत होते आणि मित्र व सहकाऱ्यांसमवेत हास्यविनोदात रमले होते, असा व्हिडीओही समोर आले आहे. मजूर पक्षाचे नेते केर स्टार्मर यांनी यावरून जॉन्सन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशाचे नेतृत्व करण्याची नैतिकता जॉन्सन यांनी गमावली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

जॉन्सन आणि त्यांची प्रेयसी केरी यांनी ही पार्टी दिली होती. या पार्टीला 40 जण उपस्थित होते. ही पार्टी डिसेंबर 20202 मध्ये झाली होती. नेमके त्याचवेळी देशात लॉकडाऊन होते. देशातील शाळा, पब आणि रेस्टॉरन्ट बंद करण्यात आली होती. ही माहिती समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला असून, जॉन्सन यांच्यावर टीका होत आहे. सामान्य नागरिक त्रासात असताना पंतप्रधान अशा प्रकारे पार्टी कसे करू शकतात, असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, जॉन्सन यांनी या सर्व प्रकारणावर मौन धारण केले आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकताच जगाला इशारा दिला आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अॅडहानॉम घेब्रेयेसिस म्हणाले आहेत की, ओमिक्रॉनची बाधा मोठ्या विक्रमी संख्येने होत आहे. अनेक देशांमध्ये डेल्टा प्रकाराला मागे टाकून ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. अनेक देशांमध्ये रुग्णालयांमध्ये जागा अपुरी पडू लागली आहे. डेल्टापेक्षा ओमिक्रॉन हा आता सौम्य वाटत आहे. विशेषत: लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये तो सौम्य आहे. याचा अर्थ असा नाही की तो सौम्य आहे.

आधीच्या कोरोना विषाणूच्या प्रकारांप्रमाणे ओमिक्रॉन हा रुग्णांना रुग्णालयात पोचवत आहे आणि त्यांचे जीवही घेत आहे, हा संघटनेचा इशारा खरा ठरत आहे. ओमिक्रॉनमुळे संसर्गाची सुनामी आली असून, ती अतिशय कमी कालावधीत आली आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणा यामुळे कोलमडून पडल्या आहेत. अनेक देशांनी ओमिक्रॉनचा कहर कमी करण्यासाठी लॉकडाऊन लावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT