Lockdown in Delhi

 

Sarkarnama

देश

कोरोनाची तिसरी लाट, मुख्यमंत्रीही पॉझिटिव्ह तरी सरकारचा धक्कादायक निर्णय

मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे मागील आठवड्यातच शाळा, महाविद्यालये, सलून, चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बस, मेट्रोमध्येही 50 टक्के प्रवाशांवर चालवण्यात येत होती. मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या दिल्ली सरकारने काही निर्बंध आणखी कडक करण्याबरोबरच एक धक्कादायकही निर्णयही घेतला आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन राजधानी दिल्लीत शनिवारी व रविवारी संचारबंदी जाहीर कऱण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांनाही घरून काम करणयाच्या सुचना देण्यात आल्याचे सिसोदिया यांनी स्पष्ट केलं.

हा महत्वाचा निर्णय घेण्याबरोबरच दिल्ली सरकारने मेट्रो (Metro) व बसव्यवस्था पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना प्रवासावरील निर्बंध कमी केले आहे. मात्र, प्रवासासाठी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच स्थानकांवर गर्दी न करण्याचे आवाहनही सिसोदिया यांनी केले आहे. मेट्रो व बस स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. मागील आठ ते दहा दिवसांत दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजारांवर पोहचला आहे. त्यापैकी 350 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून केवळ 124 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर केवळ सात रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचेही सिसोदिया यांनी सांगितलं.

असे आहेत दिल्लीतील निर्बंध...

- रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी

- सम-विषम नियमानुसार दुकाने, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत खुली राहतील.

- उद्योगधंदे सुरू राहणार

- बांधकाम क्षेत्राला दिलासा, कामे सुरू ठेवण्यास परवानगी

- उपाहरगृहे सकाळी 8 ते रात्री 10 यावेळेत तर बार हे दुपारी 12 ते रात्री 10 यावेळेत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

- चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, सभागृह अनिश्चित काळासाठी बंद राहणार

- हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, पण कार्यक्रमाचे हॉल बंद राहणार

- स्पा, जिम, सलून, ब्युटी पार्लर, योगा इन्स्टिट्यूट, मनोरंजन पार्क बंद राहणार

- दिल्ली मेट्रो, बस 100 टक्के क्षमतेने धावणार

- रिक्षा, ई-रिक्षा, टॅक्सी, सायकल रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना परवानगी

- स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम, जलतरण तलाव बंद राहणार

- सार्वजनिक उद्याने सुरू राहणार

- विवाह समारंभांना केवळ 20 लोकांना उपस्थितीची परवानगी

- सामाजिक, राजकीय, धार्मिक, उत्सव आणि इतर मनोरंजनात्मक उपक्रमांवर बंदी

- धार्मिक ठिकाणे खुली राहणार पण भक्तांना प्रवेशासाठी बंधने

- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार

- खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

- अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सुचना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT