Bhupesh Baghel Candy Crush Sarkarnama
देश

Bhupesh Baghel Candy Crush : कँडी क्रश माझं फेव्हरेट; गेम खेळण्याच्या दाव्यावर बघेलांचं भाजपला बिनधास्त उत्तर...

Chetan Zadpe

Chattisgarh News : काँग्रेसच्या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बागेल मोबाईलवर 'कँडी क्रश' गेम खेळत असल्याची बातमी तुफान व्हायरल होत होती. भारतीय जनता पक्षाने याबाबत दावा केला होता. यावर आता खुद्द बागेल यांनीच भाजपच्या या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपण कँडी क्रश खेळत असल्याची कबुली दिली आहे. हा आपला आवडता खेळ असल्याचे सांगत, कँडी क्रश मोबाईलवर खेळण्याचा आपला फोटो हा सभेपूर्वी काढलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानंतर बघेल यांनी ट्विट केले आहे. ते ट्विट करत म्हणाले,'या आधी भाजपचा आक्षेप होता की, मी विटीदांडू का खेळतो? छत्तीसगडमध्ये ऑलिम्पिक का होत आहेत? काल मी कँडी क्रश खेळत असलेल्या मीटिंगपूर्वीचा फोटो मिळाला. त्यावर आता भाजपने आक्षेप घेतला आहे. किंबहुना त्यांना माझ्यावरच आक्षेप आहे, पण कोण राहायचे आणि कोण नाही, हे छत्तीसगडचे लोक ठरवतील. मी पण गाडी चालवणार आणि विटीदांडूही खेळणार. कँडी क्रशही माझा आवडता आहे. ती पुढेही चालू राहील. बाकी छत्तीसगडच्या लोकांना कोणाला आशीर्वाद द्यायचा, हे चांगलं माहिती आहे."

अमित मालवीय यांनी मंगळवारी 'एक्स' वर फोटो शेअर करताना दावा केला की, उमेदवार निवडीसाठी बोलावलेल्या काँग्रेसच्या बैठकीत भूपेश बघेल मोबाईलवर गेम खेळत होते. मालवीय यांनी लिहिले की, 'छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे निश्चित आहेत, त्यांना माहीत आहे की, त्यांनी कितीही काही केलं तरी आता सरकार येणार नाही. कदाचित त्यामुळेच काँग्रेस उमेदवार निवडीसंदर्भातील बैठकीकडे लक्ष न देता, त्यांनी कँडी क्रश खेळणे योग्य मानले."

छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकारच्या कामगिरीच्या जोरावर काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा विश्वास आहे, तर भाजप पुन्हा एकदा येथे सरकार स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या छत्तीसगडच्या प्रभारी कुमारी सेलजा यांनी सांगितले की, 'उमेदवारांची निवड करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 12 ऑक्टोबरला बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल. भाजपने छत्तीसगडमध्ये दोन याद्या जाहीर केल्या असून, 90 पैकी 85 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT