Captain Smit Machhar speaks with Israeli PM Benjamin Netanyahu during a video call from an Abu Dhabi hospital after the Flydubai cockpit attack. Sarkarnama
देश

Captain Smit Machhar : "को-पायलटने नमाज पठणाचं कारण सांगितलं अन्..."; 'फ्लाय दुबई'च्या विमानात नेमकं काय घडलं? कॅप्टन स्मित मच्छार यांनी सगळं सांगितलं

Netanyahu Call Captain Smit Machhar : इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी संवाद साधत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांनी मच्छार यांना भारत, इस्रायल आणि जगाचा हिरो असे संबोधले. तसेच इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मशाल प्रज्वलित करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले आहे.

Jagdish Patil

Flydubai flight incident : अबू धाबीहून उड्डाण केलेल्या फ्लायदुबईच्या विमानात सह-वैमानिकाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला. अबू धाबीतील रुग्णालयातून झालेल्या व्हिडिओ कॉलमध्ये मच्छार यांनी 30 सप्टेंबर रोजी विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या घटनेचा थरारक अनुभव सांगितला.

कॅप्टन मच्छार यांनी सांगितले की, "फ्लाईट FZ1073 चे उड्डाण सुरुवातीला पूर्णपणे सुरळीत होते. काही वेळाने सह-वैमानिकाने नमाज पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या धार्मिक भावनेचा आदर करत मच्छार यांनी आपले लक्ष दुसरीकडे वळवले. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस अचानक जोरदार प्रहार झाला."

तर सुरुवातीला विमानात काही तांत्रिक समस्या निर्माण झाली असावी, असा मच्छार यांचा समज झाला. मात्र, पुन्हा पुन्हा होणाऱ्या हल्ल्यांमुळे सह-वैमानिकच आपल्यावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि कॉकपिटमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडले.

जखमी झाल्यामुळे त्यांची दृष्टीही धूसर झाली होती. त्याचवेळी विमान वेगाने खाली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फ्लाईट रडारच्या माहितीनुसार, विमान अवघ्या दोन मिनिटांत 17 हजार फुटांहून अधिक खाली आले होते. कॉकपिटच्या बाहेर प्रवाशांच्या किंकाळ्या आणि वेगाने वाहणाऱ्या हवेचा आवाज ऐकू येत होता.

या परिस्थितीत विमानाला मोठा अपघात होण्यापासून रोखण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक असल्याचे मच्छार यांच्या लक्षात आले. कॉकपिटच्या जमिनीवर पडलेल्या अवस्थेतही त्यांनी हार मानली नाही. संपूर्ण ताकद वापरून त्यांनी कॉकपिटचा आतून बंद असलेला दरवाजा उघडला.

दरवाजा उघडताच बाहेर असलेल्या प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने कॉकपिटमध्ये प्रवेश केला. त्यांनी सह-वैमानिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग सौदी अरेबियातील तबुक येथे करण्यात आले. या घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी संवाद साधत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांनी मच्छार यांना भारत, इस्रायल आणि जगाचा हिरो असे संबोधले. तसेच इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मशाल प्रज्वलित करण्यासाठी त्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT