Satyapal Malik News Sarkarnama
देश

Satyapal Malik News : सत्यपाल मलिकांभोवती 'सीबीआय'ने आवळला फास; देशभरात 30 ठिकाणी रेड

Rajanand More

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारवर अनेकदा टीका केलेले जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल यांचे घर, कार्यालयावर आज सीबीआयने रेड टाकली. त्याचप्रमाणे मुंबईसह देशभरातील 30 ठिकाणी सीबीआयने एकाचवेळी रेड टाकल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात ही रेड टाकण्यात आली आहे. (Satyapal Malik News)

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चिनाब नदीवरील प्रस्तावित किरू हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी 2019 मध्ये 2200 कोटींच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. मलिक हे 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या काळात राज्यपाल होते.

मलिक यांनीच या प्रकल्पाच्या फायलींना मंजुरी देण्यासाठी 300 कोटींच्या लाचेची ऑफर आल्याचा खुलासा केला होता. "माझ्या समोर दोन फायली आल्या होत्या. एका सचिवाने मला सांगितले की, जर मी या फायलींना मंजुरी दिली, तर मला प्रत्येकी 150 कोटी मिळू शकतात. मी काश्मीरमध्ये येताना पाच कुर्ता पायजमा आणले आहेत आणि आता त्यांच्यासोबत परत जाईन, असे सांगून मी ऑफर नाकारली,’’ असे मलिक एका कार्यक्रमात म्हणाले होते.

मलिकांच्या या गंभीर आरोपांनंतर सीबीआय सक्रिय झाली होती. 2022 पासून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, मलिक यांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे. मात्र, आज सीबीआयने पहिल्यांदाच एकाचवेळी देशभरातील 30 ठिकाणी छापेमारी केली आहे. तसेच मलिकांच्या घरी आणि कार्यालयावरही रेड टाकण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मलिकांकडून अनेकदा मोदींवर टीका

पंतप्रधान मोदी आणि भाजप राजकीय फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मोदी हे धोकादायक व्यक्ती आहेत, जे पुलवामा हल्ला घडवू शकतात ते, राम मंदिरावर हल्ला करू शकतात किंवा राजकीय फायद्यासाठी ते भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याची हत्या करू शकतात, असाही खळबळजनक दावा मलिक यांनी केला होता.

मणिपूरमधील हिंसाचारही सरकारचेच कारस्थान आहे. सरकार बदमाशांना शस्त्र पुरवून राज्यात अराजकता पसरवत असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. हिंसाचारात वापरण्यात येणारी शस्त्रे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. इन्सास रायफल बाजारात नसून सरकारच्या पायदळात उपलब्ध असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT