CBSE Examination

 

Sarkarnama

देश

शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय; दहावीच्या विद्यार्थ्यांना 'त्या' प्रश्नाचे मिळणार पूर्ण गुण

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : महिलांविषयी वादग्रस्त उल्लेख असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी लोकसभेतही उपस्थित केला होता. तसेच इतर खासदारांनीही यावरून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाद वाढू लागल्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) हा प्रश्नच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या नियमावलीमध्ये हा प्रश्न बसत नाही. त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात येत असल्याचे मंडळाने म्हटलं आहे. तसेच विद्यार्थ्यांना या प्रश्नांचे पूर्ण गुण देण्याची घोषणाही मंडळाकडून करण्यात आली आहे. मंडळाकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सोनिया गांधी यांच्यासह शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. काही दिवसांपूर्वीही सीबीएसईच्या एका प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगल झाली त्यावेळी कोणाचं सरकार होतं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही सीबीएसईला माघार घ्यावी लागली होती. मागील काही दिवसांत सीबीआयवर दोनदा ही वेळ आली आहे.

काय आहे प्रकरण?

शनिवारी इयत्ता दहावीची इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. या पेपरमध्ये महिलांशी संबंधित एक परिच्छेत देण्यात आला होता. त्यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. पण यामध्ये देण्यात आलेली काही विधाने अत्यंत आक्षेपार्ह आहेत. याबाबत अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आजकाल महिला आपल्या पतीचे ऐकत नाहीत. त्यामुळे मुलं व नोकरांमधील बेशिस्तपणा वाढला आहे, अशी काही विधाने या परिच्छेदामध्ये आहेत.

विसाव्या शतकात मुलं कमी होण्यामागे महिलांचा विद्रोह कारणीभूत असल्याचेही यामध्ये म्हटले आहे. महिलांना मुकी मिळाल्याने मुलांवरील आई-वडिलांचा अधिकार संपुष्टात आला. आपल्या पतीचा मान राखल्यानंतरच एक आई आपल्यापेक्षा छोट्यांकडून सन्मान मिळवू शकते, अशा वाक्यांचा वापर या परिच्छेदात करण्यात आला आहे.

लोकसभेत मुद्दावर चर्चा

हा मुद्दा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. सीबीएसई आणि सरकारने यावर माफी मागावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. त्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) व प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. 'अविश्वसनीय, आपण खरचं मुलांना असले शिक्षण देत आहोत? भाजपचे सरकार महिलांच्या विरोधातील या विचारांचे समर्थन करत आहे. अन्यथा सीबीएसई अभ्यासक्रमात याचा समावेशच केला नसता,' असं प्रियांका यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT