modi-sitaraman ff.jpg
modi-sitaraman ff.jpg Sarkarnama
देश

मोदी सरकारची जीएसटीमधून छप्परफाड कमाई, राज्यांना किती मिळणार?

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारला रेकॉर्डब्रेक जीएसटी गोळा झाला आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये १ लाख ३१ हजार ५२६ कोटी रुपये कररुपी सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. जीएसटीतून जमा झालेली हि दुसरी मोठी रक्कम आहे. याआधी एप्रिलमध्ये सरकारला जीएसटीमधून १.४१ लाख कोटी रुपयांची कमाई झाली होती. आता एप्रिलनंतर नोव्हेंबरमध्ये जमा झालेली रक्कम ही १.३१ लाख कोटी पेक्षाही अधिक आहे.

जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा रेकॉर्डब्रेक पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. ही कमाई म्हणजे एक प्रकारे देशामध्ये अर्थव्यवस्था रुळावर आली असल्याचेही संकेत दिले जात आहेत. लोकांचे कारखाने, उद्योग-धंद्यांनी गती पकडली असल्याचा परिणामांमुळे छप्परफाड कर तिजोरीत जमा झाला असल्याचेही बोलले जात आहेत.

राज्यांना किती पैसे मिळणार?

केंद्र सरकार राज्य सरकारला त्यांचा जीएसटीचा हिस्सा वेळेवर देत नसल्याची टीका वारंवार केली जाते. त्यामुळे आता या कमाईमधून राज्यांना किती पैसे मिळणार याची आकडेवारी बघणे गरजेचे आहे. अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या संपुर्ण कलेक्शनमध्ये सीजीएसटी म्हणजे केंद्राचा हिस्सा २३ हजार ९७८ कोटी रुपये आहे. तर एसजीएसटी म्हणजे राज्याचा हिस्सा हा ३१ हजार १२७ कोटी रुपये इतका आहे.

त्याचसोबत आयजीएसटीच्या खात्यात ६६ हजार ८१५ कोटी रुपये जातात. यात सामानाच्या आयातमधून मिळालेली रक्कम ३२ हजार १६५ कोटी रुपये इतकी आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अधिभारच्या रुपात ९ हजार ६०६ कोटी रुपये जमा झाले आहेत. यातही आयात सामानवर मिळालेला ६५३ कोटी रुपयांच्या टॅक्सचा समावेश आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अलिकडेच सरकारने अनेक धोरणांमध्ये बदल केला आहे. अनेक नियम आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये बदल केला आहे. यामुळेच जीएसटी कलेक्शन वाढले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT