नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) बाधितांचा आकडा वेगाने वाढत असून रविवारी तब्बल 1 लाख 79 हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी रुग्णसंख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. त्यातच आता केंद्र सरकारने कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्याबाबतची नवी नियमावली जारी केली आहे.
गृह विलगीकरण (Home Isolation) किंवा रुग्णालयात असलेल्या रुग्णांसाठी सरकारने ही सुधारित नियमावली केली आहे. त्यानुसार लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा गृह विलगीकरणात ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासूनच्या सात दिवसांनी या रुग्णांना डिस्चार्च दिला जाईल. तसेच या रुग्णांना सलग तीन दिवस ताप नसावा. डिस्चार्ज घेताना कोरोना चाचणीची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे.
मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Centre) दाखल करावे, अशा स्पष्ट सुचना आहेत. या रुग्णांची लक्षणे दिवसागणिक कमी होत गेल्यानंतर तसेच त्यांची नैसर्गिक ऑक्सीजन (Oxygen) पातळी सलग तीन दिवस 93 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी सोडण्यात यावे. या रुग्णांनाही चाचणी करण्याची गरज नाही. ऑक्सीजनची गरज भासणाऱ्या रुग्णांनाही वैद्यकीय सल्लानुसारच घरी सोडले जाईल.
तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना आरोग्यविषयक सर्व तक्रारींचे निरसन झाल्यानंतरच घरी सोडण्यात येईल. त्याबाबत वैद्यकीय अधिकारी निर्णय घेतील, असे नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांनी पुढील सात दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. सतत मास्क घालायला हवा. एखाद्या रुग्णाला घरी सोडल्यानंतर पुन्हा ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास तातडीने राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईन किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.