Bhupesh Baghel News Sarkarnama
देश

Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये `त्या` बावीस आमदारांनी काँग्रेसला दाखवला `हात`...

Jagdish Pansare

Chhattisgarh Assembly Election : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काँग्रेस वरिष्ठांकडे सरकारमधील विद्यमान 22 आमदारांना नारळ देण्याची मागणी केली होती. (Chhattisgarh Assembly Election 2023 Result) पाच वर्षांच्या राजवटीत आलेल्या अनुभवातून बघेल यांनी `त्या` आमदारांना पुन्हा उमेदवारी नको, असा आग्रह काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याकडे धरला.

भाजपला राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही, यासाठी दिल्लीतील काँग्रेसचे नेते कोणत्याही तडजोडीला तयार असल्याने बघेल (Bhupesh Baghel) यांना त्या 22 आमदारांची उमेदवारी कापण्यात यश आले. या धाडसी निर्णयामुळे काँग्रेसच्या (Congress) धक्का तंत्राचा उदो उदो आणि कौतुकही झाले, पण हे भाजपच्या पावलावर पाऊल टाकत धक्कातंत्राचा वापर करणे काँग्रेसच्या चांगलेच अंगलट आल्याचे आता निकालावरून दिसून येत आहे.

उमेदवारी कापण्याच्या या धक्कातंत्राचा काँग्रेसलाच असा काही धक्का बसला आहे, की त्यांच्या हातून छत्तीसगडची (Chhattisgarh) सत्ता निसटताना दिसते आहे. ज्या 22 आमदारांची उमेदवारी काँग्रेसने कापली त्या-त्या मतदारसंघात त्यांचे उमेदवार पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. (Rahul Gandhi) याचाच अर्थ उमेदवारी कापल्याचा सूड त्या त्या माजी आमदारांनी उगवल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपने छत्तीसगडमध्ये 49 जागांवर आघाडी घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर काँग्रेसची गाडी 34 च्या पुढे सरकताना दिसत नाही. 2018 च्या तुलनेत आतापर्यंतच्या आघाडीत काँग्रेसला तब्बल 34 जागांवर फटका बसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या काँग्रेसला जनतेच्या नाराजीपेक्षा पक्षाच्या उमेदवारी कापलेल्या नाराजीचाच फटका सर्वाधिक बसल्याचे आता समोर आले आहे. काँग्रेसने 90 उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हा एकूण २२ आमदारांना उमेदवारी नाकारली होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ७१ आमदार निवडून आले होते. त्यापैकी २२ उमेदवारांना पक्षाने घरचा रस्ता दाखवला होता. तीन टप्प्यांत काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या टप्प्यात 30 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यात 8 आमदारांना वगळण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात ५३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, त्यातही १० विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आले.

तिसऱ्या आणि अंतिम उमेदवारी यादीत ७ पैकी ४ विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले होते. आमदारांची तिकीट कापताना सर्व १३ मंत्र्यांना मात्र उमेदवारी देण्यात आली होती. ज्या आमदारांमुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली होती, त्या आमदारांना घरी बसवल्यामुळेच मुख्यमंत्री बघेल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे छत्तीसगड काबीज करण्याचे स्वप्न भंग पावण्याच्या वाटेवर आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT