Omprakash Chaudhari Sarkarnama
देश

Chhattisgarh Election Result 2023 : कलेक्टरची नोकरी सोडली; पण पहिल्याच निवडणुकीत हार...आता 'सीएम'साठी नाव चर्चेत!

BJP CM : ओमप्रकाश चौधरी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

Vijaykumar Dudhale

Raipur News : छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने ९० पैकी ५६ जागा जिंकून बहुमताने निवडणूक जिंकली आहे. आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. यात अर्थातच माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय असलेल्या एका तरुण चेहऱ्याचा समावेश आहे. शाह यांनी प्रचार सभेत दिलेला शब्द पाळला. माजी आयएएस अधिकारी ओमप्रकाश चौधरी हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री झाल्यास नवल वाटायला नको. (Former IAS officer OP Chaudhari's name in discussion for CM of Chhattisgarh)

राजस्थान, मध्य प्रदेशसह छत्तीसगडमध्ये भाजप सरकार बनवणार हे आता निश्चित झाले आहे. या निवडणुकीत अनेक चर्चेतील चेहरे उमेदवार होते. त्यात माजी जिल्हाधिकारी ओमप्रकाश चौधरी यांचा समावेश आहे. चौधरी हे अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. रायगडमधील एका प्रचार सभेत बोलताना अमित शाह यांनी ‘चौधरी यांना विजयी करा, मी त्यांना मोठा माणूस बनवेन. मोठा माणूस बनविणे, हे माझे काम आहे,’ असे विधान केले होते. त्यामुळे भाजप ओमप्रकाश चौधरी यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओमप्रकाश चौधरी यांनी 2018 मध्ये रायगड जिल्ह्यातील खरसियाअ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात दिवंगत काँग्रेस नेते नंदकुमार पटेल यांचे पुत्र उमेश पटेल होते. त्या निवडणुकीत उमेश पटेल यांनी ओमप्रकाश चौधरी यांचा पराभव केला होता. उमेश पटेल यांनी चौधरी यांचा 16 हजार 976 मतांनी पराभव केला होता. उमेश पटेल यांना 94 हजार 201 मते मिळाली, तर ओमप्रकाश चौधरी यांना 77 हजार 234 मतांवर समाधान मानावे लागले.

ओमप्रकाश चौधरी हे रायगड जिल्ह्यातील बायंग गावचे रहिवासी आहेत. रायगड जिल्ह्यातून आयएएस अधिकारी होणारे चौधरी हे पहिली व्यक्ती आहेत. त्यांनी 13 वर्षांच्या सेवेत छत्तीसगडमध्ये अनेक योजनांवर काम केले. त्या कामाचे राष्ट्रीय पातळीवरही कौतुक झाले. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील प्रयास शाळा ही चौधरी यांची देण असल्याचे मानले जाते. दंतेवाडाचे जिल्हाधिकारी असतानाही त्यांनी नक्षलग्रस्त भागात शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले होते.

पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारानेही ओमप्रकाश यांना सन्मानित करण्यात आले आहे. चौधरी हे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आयएएस झाले होते. त्यांचे वडील दीनानाथ चौधरी हे पेशाने शिक्षक होते. ओपी दुसऱ्या वर्गात असताना वडिलांचे निधन झाले. त्यांनी प्राथमिक आणि शालेय शिक्षण त्यांच्या मूळगावी पूर्ण केले. भिलाई येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. ओमप्रकाश चौधरी हे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. रायपूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

तब्बल 13 वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर ओमप्रकाश चौधरी यांनी जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. मागील 2018 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रायगडमधून चौधरी यांना उमेदवारी दिली होती. गृहमंत्री अमित शाह यांच्याशी जवळीक असल्याने भाजप छत्तीसगडची कमान ओमप्रकाश चौधरी यांच्याकडे सोपवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT