Chirag Paswan, Ramdas Athawale  Sarkarnama
देश

SC ST reservation : आजही अस्पृश्यतेचा सामना करावा लागतोय, म्हणून..! मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्रीच उतरले मैदानात

Chirag Paswan, Ramdas Athawale, anti reservation protest, caste reservation : आरक्षण रद्द करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांचा इशारा; आजही दलितांवर अस्पृश्यता, भेदभाव कायम असल्याची खंत. रामदास आठवले यांचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा मागणी.

Rajanand More

Reservation in India : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या उत्तराखंड येथील पक्षाच्या कार्यक्रमानंतर एका संघटनेने तेथील व्यासपीठाचे शुध्दीकरण केले होते. हा मुद्दा संसदेतही गाजला होता. यावर केंद्रीय मंत्र्यांकडूनही सभागृहात नाराजी व्यक्त केली होती. हा मुद्दा शांत झालेला असतानाच आरक्षण रद्द करण्याच्या मागणीने देशातील राजकारण तापू लागले आहे.

मागील आठवड्यात दिल्लीत काही संघटनांकडून अनुसूचित जाती, जमातींसाठी असलेले आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. सोशल मीडियातूनही आरक्षण रद्द करण्याबाबत मागणी होत आहे. यापार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या मागणीवरून आरक्षण म्हणजे खैरात नसून घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत ठणकावले आहे.

पासवान यांनी आरक्षणाचे समर्थन करतानाच देशात अजूनही अस्पृश्यता आणि भेदभावाचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, आरक्षण रद्द करा, असे कुणी म्हणाले म्हणून ते रद्द होऊ शकते का? आरक्षण घटनात्मक अधिकार असून खैरात नाही. हा अधिकार जगातील कोणतीही ताकद हिरावून घेऊ शकत नाही.

आरक्षण हटविण्याची मागणी करणारे आरक्षणाची नेमकी गरज समजून घेत नाहीत. खर्गे उपस्थित असलेला मंच नंतर शुध्द करण्यात आला की नाही? आजही दलित तरुणाला घोड्यावर बसू दिले जात नाही. लग्नाची वरात काढण्यापासून रोखले जाते. एखादा नेता मंदिरात गेल्यानंतर काहीवेळा तो परिसर गंगाजलाने स्वच्छ केला जातो. याचा अर्थ आजही भेदभाव कायम आहे, असे पासवान यांनी सांगितले. मी जोपर्यंत सरकारचा भाग आहे, तोपर्यंत आरक्षण व्यवस्थेला कमकुवत होऊ देणार नाही, असेही पासवान यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना ठणकावून सांगितले.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे विधान केले आहे. आरक्षण हा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत ते म्हणाले, आरक्षणाला विरोध म्हणजे राज्यघटनेला विरोध आहे. जे आरक्षणविरोधी भूमिका घेत आहेत ते घटनाविरोधी आहेत. त्यांच्यावर देशद्रोहासारखी कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT