CJI Dhananjay Chandrachud Sarkarnama
देश

Chandigarh Mayoral Polls : चंद्रचूड यांचा भाजपला झटका; निवडणूक अधिकाऱ्याला झाप झाप झापलं अन् घाम फोडला

Rajanand More

New Delhi : चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गोंधळावर सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर जोरदार ताशेरे ओढले. निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेशी छेडछाड केली. ही लोकशाही हत्या असल्याचे मत व्यक्त करत चंद्रचूड यांनी महापालिकेची बैठक घेण्यासही मनाई केली. त्यामुळे हा भाजपसाठी दणका मानला जात आहे. (CJI Dhananjay Chandrachud News)

चंदीगड महापौरपदाची निवडणूक (Chandigarh Mayoral Polls) 30 जानेवारीला झाली. या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी इंडिया आघाडीची आठ मतं अवैध ठरवली होती. त्यामुळे भाजपचा (BJP) उमेदवार निवडून आला. आघाडीच्या उमेदवाराला केवळ बारा मते मिळाली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. आप व काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी भाजपवर आरोप करत निवडणुकीत जाणीवपूर्वक आठ नगरसेवकांची मते अवैध ठरवल्याचा आरोप केला होता.

नगरसेवक कुलदीप कुमार यांनी या गोंधळानंतर निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज सरन्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. यावेळी चंद्रचूड म्हणाले, निवडणूक अधिकारी अशाप्रकारे निवडणूक कशी घेऊ शकतात? अशी अधिकाऱ्यांची वागणूक असते? ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीची हत्या आहे. हे पाहून आम्ही हैराण झालो. या व्यक्तीवर कारवाई व्हायला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचिकाकर्त्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात निवडणूक अधिकाऱ्यांचा एक व्हिडीओ सादर केला होता. निवडणूक अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्यानंतर न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले. मतपत्रिका, व्हिडीओ शुटिंग आदी सर्व माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी सोपवण्याची नोटीस काढण्यासही न्यायालयाने सांगितले.

पुढील सुनावणीपर्यंत चंदीगड महापालिकेची बैठक घेण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. निवडणुकीमध्ये आघाडीकडे 20 मते होती. या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार, हे निश्चित मानले जात होते. आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी मतदानही केले. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यापैकी आठ मते अवैध ठरवली. त्यामुळे आघाडीला केवळ बारा मते मिळाली. परिणामी भाजपचा उमेदवार 16 मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT