Thousands of CJP Parliament protest supporters gather near Parliament as police attempt to stop the march. 
देश

CJP Protest : "मोदी-शहा चले जाव! झुरळांचा संसदेवरील मोर्चा 56 इंची छातीवाल्यांचे पाय लटपटवणारा; तुरुंग, बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील...", सामनातून हल्लाबोल

Shivsena UBT on Pm Narendra Modi : 'देशभरात मोदी यांच्या विरोधात जनक्षोभ उसळून आला आहे. एक बेमुर्वतखोर हुकूमशहा व त्यांच्या झुंडटोळीविरुद्ध राज्याराज्यांतील युवाशक्ती रस्त्यावर उतरली आहे. ‘तानाशाही नही चलेगी’, ‘मोदी सत्ता सोडा’ अशा गर्जना देशातील रस्त्यारस्त्यांवर ऐकू येत आहेत.'

Jagdish Patil

CJP Parliament Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात काल संसदेवर मोर्चा धडकला. या मोर्चासाठी हजारो तरूण मुलं रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. या मोर्चा दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. आता याच मोर्चावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून 'झुरळांनी बंड पुकारले आहे. मोदी-शहा चले जाव, असं म्हणत सरकारवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे.

'देशभरात मोदी यांच्या विरोधात जनक्षोभ उसळून आला आहे. एक बेमुर्वतखोर हुकूमशहा व त्यांच्या झुंडटोळीविरुद्ध राज्याराज्यांतील युवाशक्ती रस्त्यावर उतरली आहे. ‘तानाशाही नही चलेगी’, ‘मोदी सत्ता सोडा’ अशा गर्जना देशातील रस्त्यारस्त्यांवर ऐकू येत आहेत. जनतेने भय, अंधभक्तीचे ओझे फेकून दिले असेल आणि निर्भयतेची कवचकुंडले घालून रस्त्यावर उतरण्याचे ठरवले असेल तर मोदी सरकारचे तुरुंगही कमी पडतील आणि बंदुकीच्या गोळ्याही कमी पडतील, असे संतप्त वातावरण दिसू लागले आहे.', असं लिहित सामनातून सरकारविरोधात जनतेत रोष असल्याचं म्हटलं आहे.

तर सोमवारी संसद भवनावर निघालेला प्रचंड मोर्चा 56 इंची छातीवाल्यांचे पाय लटपटवणारा आहे. या मोर्चावर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. भयंकर लाठीमार केला. बंदुका रोखल्या तरी तरुण मागे हटले नाहीत. या आंदोलनाने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला आहे. या संतप्त जनक्षोभाचे जनक हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्य कांत आहेत. बेरोजगार तरुणांना ‘झुरळा’ची उपमा देऊन सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तरुणांच्या असंतोषाला तोंड फोडले, असंही सामनात म्हटलं आहे.

शिवाय सोनम वांगचुक यांनी या ‘झुरळां’चे नेतृत्व स्वीकारले व ते ‘जंतर मंतर’वर निर्णायक लढ्यासाठी उपोषणाला बसले. भाजपच्या एकाही पुढाऱ्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा राष्ट्रकार्यासाठी उपोषण केल्याची नोंद नाही. त्यामुळे उपोषण किती तेजस्वी असते हे त्यांना कधीच समजणार नाही, असा टोलाही भाजपला लगावला आहे.

तर वांगचुक यांचे उपोषण काय पाच मिनिटांत चिरडू असा त्यांचा अहंकार होता, पण वांगचुक यांचे उपोषण 20 दिवस चालले व ते बलिदानासाठी सज्ज झाले तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली. त्यांनी वांगचुक यांना उचलले व रुग्णालयात नेले. मात्र त्याबरोबरच देशभरात असंतोषाचा वणवा पेटून लाखो झुरळे दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर जमली. त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा सुरू झाल्या. वांगचुक इस्पितळात व ‘जंतर मंतर’वर झुरळांची अलोट गर्दी हे चित्र सरकारचे चित्त विचलित करणारे आहे.

मोर्चाने तर थेट संसद भवनालाच धडक दिली. देशातल्या विविध भागांतून झुरळांच्या आंदोलनाच्या बातम्या येत असल्या तरी शिक्षणाचे मंदिर भ्रष्ट करणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला मोदी तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान असे कोण लागून गेले आहेत? ते काय सरकारचे जावई आहेत की मोदी यांचे मानसपुत्र? असा सवाल करत ते कुणाचे कोणीही असोत, त्यांनी भारतीय तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. ‘नीट’ परीक्षेचे पेपर फोडण्याची जबाबदारी प्रधानांच्याच शिरावर येते व त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी, अशी रोखठोक भूमिका सामनातून मांडण्यात आली आहे.

मोदी हे 12 वर्षांत 12 लाख वेळा देशाशी खोटे बोलले

देशात कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने अराजक पेटले आहे, मणिपूर जळत आहे, भ्रष्टाचार टोकाला गेला आहे, केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोगाने लाज सोडली आहे, तरी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मोदी घेत नाहीत. या सर्व हरामखोर व नालायक मंत्र्यांना पाठीशी घालून देश बरबाद करण्याचा ‘द्रोह’ मोदी करत आहेत. म्हणून लाखो झुरळे संसद भवनावर धडक देऊन मोदी यांचा राजीनामा मागत आहेत. हीच आता क्रांतीची सुरुवात आहे. मोदी हे पंतप्रधान म्हणून त्यांच्या कर्तव्यास मुकले आहेत. हा देशद्रोह आहे. मोदी हे 12 वर्षांत 12 लाख वेळा देशाशी खोटे बोलले आहेत, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.

मोदी-शहा चले जाव

तर मोदींनी त्यांनी निर्माण केलेल्या अंधभक्तांनी लोकशाहीची प्रतिष्ठा नष्ट केली. देशातील निवडणुका आणि निकाल चोरण्यात आले. मोदी यांचा भंपकपणा उघडा पडला आहे. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लाखो झुरळे क्रांतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. याक्षणी जय शहा कोठे आहेत? ते नक्कीच परदेशात सुरक्षित आहेत. केंद्रीय मंत्र्यांची मुले परदेशातील विद्यापीठांत शिकत आहेत. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करीत आहेत, पण लाखो बेरोजगार झुरळांनी या मुलांच्या बापांची झोप उडवली आहे. झुरळे त्यांच्या घरात घुसतील. प्रधानमंत्री कार्यालयात, गृहमंत्रालयात, शिक्षण मंत्रालयात, सर्वोच्च न्यायालयात, राज भवनात घुसतील. तुमचे जगणे मुश्कील करतील. झुरळांनी बंड पुकारले आहे. मोदी-शहा चले जाव, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेने मोदी-शहांवर टीकास्र डागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT