Charanjit Singh Channi and Narendra Modi  Sarkarnama
देश

मोदींचा पंजाब दौरा पुन्हा वादात; आता 'तीच' वेळ मुख्यमंत्र्यांवर आली!

मागील महिन्यात पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दौरा करावा लागला होता.

सरकारनामा ब्युरो

अमृतसर : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election 2022) रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मागील महिन्यात मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याने सभा रद्द करून त्यांना दिल्लीला परतावे लागले होते. त्यानंतर सोमवारी (ता. 14) पंतप्रधानांची पंजाबमध्ये सभा झाली. पण त्यांच्या या सभेचा फटका मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (CharanJit singh Channi) यांना बसला.

पंतप्रधान मोदींची सोमवारी जालंधर येथे सभा झाली. तर त्याच वेळेत होशियारपूर येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही सभा झाली. या सभेसाठी चन्नी हे हेलिकॉप्टरने चंडीगड येथील राजेंद्र पार्कमधून होशियारपूरला जाणार होते. पण त्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगीच देण्यात आली नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या भागात 'नो फ्लाय झोन' घोषित करण्यात आला होता.

राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी मिळाल्याने ते सभेला जाऊ शकले. पण चन्नी यांना सभेला उपस्थित राहता आले नाही. यावरून काँग्रेसचे नेते सुनिल जाखड (Sunil Jakhar) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, चन्नी यांचा दौरा आधीच ठरला होता. पण केद्र सरकारने त्यांना इथे येण्यास परवानगी दिली नाही, हे लाजिरवाणे आहे. निवडणूक आयोगानं याची दखल घेतली नाही, तर निवडणूक हा केवळ दिखावा असल्याचे आम्ही समजू.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, पंजाबमध्ये आलो तेव्हा फिरोजपूरला जाऊ दिले नाही. त्यांच्या जीवाला धोका होता. आज चन्नी यांना होशियारपूर येथे जाण्यापासून रोखले. आता मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की, त्यांनी यावर काही तरी बोलावे, असं जाखड म्हणाले आहेत.

काय घडलं होतं पाच जानेवारीला?

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून पाच जानेवारी रोजी विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. पण भटिंडा विमानतळावरून निघालेला पंतप्रधान मोदींचा ताफा मार्गातच आंदोलन सुरू असल्याने थांबवण्यात आला होता. सुमारे 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांना थांबावे लागले. त्यानंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना झाले. पंतप्रधानांवर हल्ला करण्याचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप यावेळी भाजपकडून करण्यात आला होता. त्यावर बराच वादही निर्माण झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चौकशीसाठी समिती नेमली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT