मुंबई : शिवसेनेचे खासदार बंडाच्या पवित्र्यात असून ते लोकसभेत वेगळ गट स्थापन करण्याची शक्यता आहे. या गटाचे नेतृत्व राहुल शेवाळे यांच्याकडे दिले जाऊ शकते. तसेच शेवाळे यांच्यावर केंद्रातही मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शब्द टाकणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (Shiv Sena Latest Marathi News)
राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावी, ही मागणी पहिल्यांदा राहुल शेवाळे यांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. त्यानंतर इतर खासदारांनीही त्याचीच री ओढली. त्याचप्रमाणे शेवाळे यांनी सर्व खासदारांना एकत्र करण्यात, त्यांची गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे समजते.
शेवाळे यांच्या या कामाचे त्यांना गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे तरुण आणि उच्च शिक्षित खासदार आहेत तसेच त्यांना मुंबई महानगर पालिका कामाचा देखील दांडगा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकीत धोबीपाछाड द्यायचे असेल तर शेवाळेंना केंद्रात महत्वाचे स्थान द्यावे, असे शिंदे यांना वाटते. यामुळे ते पंतप्रधान मोदींकडे शेवाळे यांच्यासाठी विशेष शब्द टाकणार असल्याचे समजते. त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दादर येथे पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनात शिंदे यांचं वर्चस्व राहणार की ठाकरेंचा याचे उत्तर पुढील काही दिवसांतच मिळू शकेल. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुनावणी आहे. त्यावर शिवसेनेचे आणि शिंदे सरकारच्या अस्तित्वाचा फैसला होऊ शकतो.
न्यायालयात सुनावणी होण्याआधीच शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नव्या कार्यकारिणीची घोषणा त्यांनी केली आहे. पण पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांनाच कायम ठेवले आहे. तर मुख्य नेतेपद स्वत:कडे ठेवले आहे. तर आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात आहेत.
आमदार, खासदारांसह आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. अनेक जिल्ह्यांतून त्यांना पाठिंबाही वाढत चालला आहे. ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्यांना त्याच पदावर नियुक्ती दिली जात आहे. ठाकरेंवर नाराज असलेल्या नेत्यांना पदं दिली जात आहेत. माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे शिंदे यांनी आता संपूर्ण शिवसेनाच ताब्यात घेण्यासाठी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.