CM Siddaramaiah helicopter : विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाडाची घटनाही घडली. त्यामुळे सध्या अशा घटनांबाबत देशात सातत्याने चर्चा होत आहेत. अशीच एक प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकविणारी घटना कर्नाटकात घडली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याच बाबतीत ही घटना घडल्याने संपूर्ण यंत्रणा हादरली होती.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे माजी मंत्री अमरगौडा पाटील बय्यापूर यांच्या नातवाच्या लग्नासाठी लिंगसुगूर येथे येणार होते. त्यासाठी प्रशासनाने रायचूर येथे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांसाठी एक विशेष हेलिपॅड तयार केले होते. त्यामुळे याठिकाणी हायप्रोफाईल सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जय्यत तयारी करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर येण्याची वेळ झाली होती. त्यानुसार प्रशासन सज्ज होते. हेलिपॅडच्या दिशेने हेलिकॉप्टर येतानाही दिसले. पण काही वेळे हेलिकॉप्टर हवेतच घिरट्या घालताना दिसले आणि नंतर अचानक गायब झाले. त्यामुळे हेलिपॅडवर उपस्थितांच्या काळाजाचा ठोका चुकला. नेमके काय झाले अनेकांना कळालेच नाही.
अखेर काही मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर जवळच्या दुसऱ्या हेलिपॅडवर उतरणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हे हेलिपॅड भाजपच्या एका आमदाराचे खासगी हेलिपॅड होते. सिध्दरामय्या यांचे हेलिकॉप्टर नियोजनानुसार उतरविण्यात येणाऱ्या हेलिपॅडवर आधीपासूनच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे हेलिकॉप्टर होते. सिध्दरामय्या बसलेल्या हेलिकॉप्टरच्या पायलटहा उशिराने ही बाब निदर्शनास आल्याने त्यांना अचानक दुसरीकडे हेलिकॉप्टर उतरवावे लागल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. संपूर्ण लवाजमा भाजप आमदाराच्या हेलिपॅडकडे रवाना झाला. या हेलिपॅडवर सुरक्षेची कोणतीही यंत्रणा उभारण्यात आली नसल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनासह पोलिसांमधील गलथानपणाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आधीपासूनच हेलिपॅडवर उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर असताना त्याची माहिती आधीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटला काही दिली गेली नाही, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत निकाळजीपणा झाला का, दोघांच्या वेळांचे नियोजन करण्यात आले नव्हते का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.