Narendra modi  Sarkarnama
देश

Yogi Adityanath: पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण? योगी-शर्मा शीतयुद्ध सुरु

Yogi Adityanath and AK Sharma share cryptic posts:सिन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशीच मोदी यांची इच्छा होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन उत्तर प्रदेश प्रभारी कृष्णगोपाल यांचा मनोज सिन्हा यांच्या नावाला विरोध होता.

सरकारनामा ब्युरो

शरद प्रधान

उत्तर प्रदेशात आठ वर्षांपासून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असून, दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीची तयारी त्यांच्याकडून होत आहे. मात्र, भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाबरोबर त्यांचे शीतयुद्ध सुरू असून, ऊर्जामंत्री ए. के. शर्मा यांच्या पोस्टमधून हे शीतयुद्ध उघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण, या प्रश्नामध्येच या शीतयुद्धाची कारणे स्पष्ट होतात.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून जवळपास आठ वर्षांचा कालावधी झाला आहे. सलग दुसऱ्या टर्ममध्ये विजय मिळवत, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावर आले आहेत. हा उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक कामगिरी असून, २०२७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत पुन्हा सत्तेवर येण्यासाठीही योगींचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विजयाची हॅट्ट्रिक करीत, पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी योगींपुढे अनेक आव्हाने आहेत. त्यातील एक आव्हान कायम त्यांच्याभोवती असते आणि त्यांच्या भवितव्यासाठीही गंभीर चिंता निर्माण होऊ शकते. हे आव्हान २०१७मध्ये योगी यांना मुख्यमंत्रिपदावर नेणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाकडूनच असल्याचे वारंवार लक्षात आले आहे.

तडजोडीचा उमेदवार ते प्रबळ नेता

भाजपने २०१७मध्ये उत्तर प्रदेशात खूप मोठा विजय मिळविला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योगी यांना पसंती नव्हती, हे सर्वज्ञात आहे. त्यावेळी मोदी यांचे अत्यंत विश्‍वासू मानले जाणारे मनोज सिन्हा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते.

सिन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशीच मोदी यांची इच्छा होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन उत्तर प्रदेश प्रभारी कृष्णगोपाल यांचा मनोज सिन्हा यांच्या नावाला विरोध होता. त्यावेळी योगी यांच्याकडूनही स्वतःचे नाव समोर आणले जात होते आणि तडजोडीचा उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. योगी यांना सहजपणे सांभाळता येईल, असे मोदी आणि अमित शहा यांना त्यावेळी वाटत होते.

कालांतराने योगी आपली प्रतिमा जनमानसात रुजवत गेले आणि ‘हिंदूहृदयसम्राट’ अशी ओळख त्यांनी मिळविली. त्यामुळेच, २०२२मध्ये सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर, योगी यांचा दावा अधिक प्रबळ होता आणि ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेही. त्यावेळीही योगी यांच्याऐवजी अन्य नेत्याला मुख्यमंत्री करण्याविषयी दिल्लीतील नेत्यांकडून प्रयत्न झाले होते.

सत्तासंघर्षाचे नवे वळण

मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी योगी स्पर्धक ठरू शकतात, असे अमित शहा यांना कायम वाटत आले आहे. भाजपमधील एका गटाला योगी आदित्यनाथ हे मोदी यांचे स्वाभाविक उत्तराधिकारी आहेत, असे वाटते. त्यामुळे, हा समज आणखी गडद होत जातो. या काळात मोदी आणि शहा यांनी केशवप्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्या रूपाने दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले. त्यातून योगी यांच्यावर अंकुश राहील, असा त्यांचा कयास होता. मात्र, योगी या काळामध्येही स्वतःचा बचाव करण्यामध्ये यशस्वी ठरले.

केंद्रातील नेतृत्वाकडून योगी यांना उत्तर प्रदेशऐवजी अन्य जबाबदारी देण्याविषयी प्रयत्न झाले. मात्र, योगी प्रत्येक वेळी नशीबवान ठरले आणि परिस्थिती योगी यांनाच अनुकूल ठरत गेली. ही रस्सीखेच ठरत असतानाच, दिल्लीतील ‘दरबारा’ने नुकतीच आणखी एक खेळी केली. त्यामुळे लखनौ आणि दिल्ली यांच्यातील सध्याच्या सत्ता संघर्षाने नवे वळण घेतले आहे.

शर्मा यांचा उदय

पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय ए. के. शर्मा उत्तर प्रदेशमध्ये ऊर्जामंत्री आहेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. शर्मा यांनी ‘एक्स’वर केलेली एक पोस्ट उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये सध्या चर्चेचा विषय झाली असून, यामध्ये आपल्या जिवाला धोका आहे, असा खळबळजनक दावा शर्मा यांनी केला आहे. ‘माझ्या हत्येसाठी कोणी तरी सुपारी दिली आहे,’ अशा आशयाची ही पोस्ट आहे. त्याचबरोबर मला कनिष्ठ अभियंत्याची बदली करण्याचेही अधिकार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले असून, त्यातून त्यांची उद्विग्नता अधिकाधिक दिसून येते. शर्मा आयएएस अधिकारी होते.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते मुख्यमंत्री कार्यालयात आणि पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना उत्तर प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवरही घेण्यात आले. योगी यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये ऊर्जा व नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. शर्मा यांना गुजरातमधून ‘पॅराड्रॉप’ केले आहे, असा योगी यांचा समज आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच योगी यांनी त्यांना विरोध केला आहे.

वीज खासगीकरणाचेही कारण

योगी आणि शर्मा यांच्यातील शीतयुद्ध हे योगी आदित्यनाथ आणि दिल्लीतील भाजपचे नेतृत्व यांच्यातील सत्तासंघर्षाचा एक भाग आहे, असेच मानले जात आहे. यामध्ये शर्मा यांनी आतापर्यंत शांत राहणे पसंत केले होते. उत्तर प्रदेश सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री मोदी-शहांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांनीही योगी यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, शर्मा यांनी पहिल्यांदा आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यांचे नैराश्य सार्वजनिक स्वरूपात मांडले आहे. शर्मा यांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच, उत्तर प्रदेश ऊर्जा महामंडळाचे खासगीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून आला आहे.

राज्यातील वीज वितरणाचा हा व्यवसाय अतिशय मोठा असून, ही सार्वजनिक कंपनी मोदी यांचे निकटवर्तीय अदानी यांना देण्याचा विचार आहे, असा संशय अभियंते आणि कर्मचाऱ्यांना आहे. मोदी व शहा यांची अदानी यांच्याबरोबरील नजिकता हे खुले रहस्य आहे. त्यामुळेच योगी यांनी या प्रयत्नांना विरोध केला आहे. मोदी-शहा यांच्यामुळेच अदानी यांना अनेक राज्यांतील वीज क्षेत्रामध्ये प्रवेश करता आला आहे. त्यामुळेच मोदी यांनी शर्मा यांच्यासारख्या सर्वाधिक विश्वासू व्यक्तीला राज्याच्या ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाचा प्रमुख कार्यक्रम घेऊन उत्तर प्रदेशात पाठविले आहे, असे मानले जाते.

कथेच्या रुपकातून हल्ला

शर्मा यांना मंत्रिपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळामध्ये फारसे काही करता आलेले नाही. त्यामुळेच ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी सर्व निराशा बाहेर काढली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ‘मंत्र्याकडे एखाद्याची बदली करण्याची किंवा निलंबन करण्याचेही अधिकार नाही, तो काय करेल, असे ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी मी रामायणातील एक गोष्ट सांगतो.

एकदा प्रभू राम सीतामातेसह बसले होते. इंद्राचा मुलगा जयंत याने सीतामातेला त्रास दिला होता. त्यावर प्रभूरामांनी एक गवताची काडी फेकली. या काडीचे रुपांतर बाणामध्ये झाले आणि तो बाण जयंताच्या दिशेने जाऊ लागला. त्यावर घाबरलेल्या जयंताने रामांची माफी मागितली. तुमच्या दिशेनेही मी अशीच गवताची काडी फेकेन, की तेव्हा तुम्ही दिल्लीपर्यंत गेलात किंवा राष्ट्रपती भवनापर्यंत गेलात, तरी तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही.’

शर्मा यांनी या पोस्टमध्ये अधिकाऱ्यांना लक्ष्य केले असले, तरीही त्यांच्या निशाण्यावर खासगीकरणाच्या प्रयत्नांना विरोध करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच होते, असे राजकीय निरीक्षक मानतात. शर्मा यांनी गोष्टीच्या रुपकातून त्यांची आक्रमक भूमिका स्पष्ट होते. त्यातूनच उघडपणे धमकी देण्याचे बळही मिळत आहे. त्यांच्या या वाढलेल्या धाडसामागे आणि बंडखोरीमागे कोण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.

शर्मांना बळ कोणाकडून?

शर्मा यांची पार्श्वभूमी पाहिली, तर उत्तर प्रदेशाच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश घडवून आणण्यात आला, त्यावेळी त्यांनी संयमी भूमिका घेतली होती. सुरुवातीला योगी यांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे, प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, २०२२मध्ये योगी यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले. शर्मा यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. मात्र, राज्यातील वीजपुरवठ्याची परिस्थिती सुधारण्यात त्यांना यश आले नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी विश्वासार्हता निर्माण होऊ शकली नाही. राज्यात २४ तास वीजपुरवठा होत आहे, असा दावा योगी यांच्याकडून करण्याचा प्रयत्न झाला, मात्र वास्तवातील परिस्थिती खूपच वेगळी आहे.

शर्मा यांनी गेल्या महिन्यात देवरियाला जिल्ह्यात भेट दिली. त्यावेळी दिवसातून तीन-चार तासच वीज कशीबशी मिळते, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या. त्या तक्रारींची दखल घेण्याऐवजी शर्मा यांनी हात उंचावत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या आणि त्यांच्या वाहनांचा ताफा निघून गेला. सध्याच्या या शीतयुद्धामध्ये योगी यांनी पहिली फेरी जिंकली आहे. मात्र, दिल्लीतील नेतृत्वाकडून त्यांना यापुढेही त्यांच्या पद्धतीने कारभार करू दिला जाईल, हाच खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT