Yogi Adityanath, Narendra Modi sarkarnama
देश

योगी ठरणार मोदींचे उत्तराधिकारी? ; राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री!

भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात योगी हा ‘फिट्ट' बसणारा चेहरा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे उत्तराधिकारी कोण असणार, या मुद्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधून यावर अद्याप कोणीही तोंड उघडलेले नाही. उत्तरप्रदेशात दुसऱ्यांदा सत्ता मिळविणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री होणार आहे. याबाबतच्या हालचाली राजधानी दिल्लीत सुरु आहेत. आज योगी आदित्यनाथ हे दिल्लीचा दैारा करीत आहेत. त्यांची भाजपच्या संसदीय मंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

लोकसभेच्या विजयाची चावी मानल्या जाणाऱया उत्तर प्रदेशासारख्या राज्याची शक्ती त्यांच्या मागे आहे. अनेक राज्यांत मोदींनंतर योगी यांना प्रचारासाठी बोलविण्याची भाजप नेत्यांची मागणी असते. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात योगी हा ‘फिट्ट' बसणारा चेहरा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

योगी यांचा भाजप संसदीय मंडळातील संभाव्य प्रवेश हा त्यांची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मार्गावरून सुरू असल्याचेही द्योतक मानले जाते. याआदी २०१३ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भाजपने आधी त्यांचा संसदीय मंडळात समावेश करून नंतर त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही या मंडळात सामील करून घेण्यात आले होते.

योगी आदित्यनाथ यांची वर्णी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात लागणार हे जवळपास निश्चित आहे. सत्तारूढ पक्षाच्या या सर्वशक्तीमान मंडळात स्थान मिळणे हे योगी यांच्या भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत करणारे ठरणार आहे. ‘सुयोग्य वेळ'आल्यावर योगी यांना भाजपच्या मातृसंस्थेकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

योगी यांचा समावेश झाल्यास ते या मंडळातील दुसरे मुख्यमंत्री ठरतील. आपल्या दिल्ली दौऱयात योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदी, संररक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या नेत्यांशी गाठीभेटी घेणार आहेत. मोदी यांना भेटल्यावर भाजपकडून त्यांच्या संसदीय मंडळातील समावेशाबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. राजनाथसिह, शहा व गडकरी या तिघांनीही याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. भाजप संसदीय मंडळात सुषमा स्वराज, अरूण जेटली व अनंतकुमार या दिग्गजांच्या निधनानंतर तीन जागा रिक्त आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असणार, या मुद्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधून यावर अद्याप कोणीही तोंड उघडलेले नाही. वर्तमान समीकरणांप्रमाणे भाजपमध्ये मोदी यांच्यानंतर शहा यांचे स्थान आहे व त्यांचाच शब्द मोदींनंतर अंतिम मानला जातो. नड्डा अधिकृत पक्षाध्यक्ष असले तरी महत्वाच्या मुद्यांवर शहा यांनाच सूत्रे हाती घेण्यास सांगितले जाते हा अनुभव आहे. मात्र शहा मोदी यांचे पंतप्रधानपदाचे वारसदार ठरणार का, हा सवाल भाजपच्या अंतर्गत वर्तुळात विचारला जातो.

शहा यांची कार्यपध्दती पडद्यामागून काम करण्याची व सूत्रे हलविण्याची आहे. त्यांचे सडेतोड बोलणेही अनेक भाजप मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेत्यांना दुखावणारे ठरले आहे. दुसरीकडे योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशासारखे राज्य भाजपने पुन्हा खेचून घेतल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा ‘ग्राफ' चढा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT