Yogi Adityanath, Radha Mohan Das Agrawal Sarkarnama
देश

ज्या आमदारासाठी योगींनी भाजपला धक्का दिला, त्याचंच स्वत:साठी तिकीट कापलं!

योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

गोरखपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे गोरखपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरूवातीला मथूरा नंतर अयोध्या, अशा पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर अखेर त्यांनी गोरखपूर (Gorakhpur) हा सुरक्षित मतदारसंघ निवडला. हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून भाजपचा (BJP) बालेकिल्ला आहे. पण याच मतदारसंघात योगींनी भाजपच्याच उमेदवाराचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं.

योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून पाचवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. आता ते पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. त्यासाठी त्यांनी गोरखपूर हाच मतदारसंघ निवडला आहे. विधानसभेच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होत असताना सुरूवातीला योगी हे अयोध्या किंवा मथूरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा होती. पण उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर योगींनी गोऱखपूरला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले.

योगी आदित्यनाथ हे गोरखनाथ मठाचे प्रमुख असून या भागात त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे या भागातील आमदारांच्या डोक्यावर योगींचा हात म्हणजे विजयाची हमी, असं समीकरण आहे. सध्या राधा मोहन दास अग्रवाल हे विद्यमान आमदार असून त्यांची ही चौथी टर्म आहे. विशेष म्हणजे वीस वर्षांपूर्वी योगींनीच अग्रवाल यांना या मतदारसंघातून निवडून आणले होते.

गोरखपूर हा भाजपचा 33 वर्षांपासून बालेकिल्ला राहिला आहे. भाजपचे शिव प्रताप शुक्ला हे 1989 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. 2002 मध्ये मात्र योगींनी हिंदू महासभेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अग्रवाल हे त्यावेळी उमेदवार होते. त्यांच्या विजयासाठी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये अनेक सभाही घेतल्या. त्यामुळे दास यांनी शुक्लांचा पराभव करत विजय मिळवला. शुल्का यांना या निवडणुकीत केवळ 14 हजार मतं मिळाली होती.

भाजपने 2007 मध्ये अगरवाल यांनाच उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते 49 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर 2012 आणि 2017 मध्येही त्यांनी भाजपच्या तिकीटावर विजय मिळवला. आता 2022 मध्येही त्यांना तिकीट मिळण्याची खात्री होती. योगींची उमेदवारी जाहीर होण्याच्या काही दिवस आधीपर्यंत ते प्रचार करत होते. योगींचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी त्याचं स्वागतही केलं. पण योगींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अग्रवाल त्यांच्यावर नाराज होते, अशीही चर्चा आहे. त्यामुळेच त्यांचं तिकीट कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT