Public protests over education issues intensified before Union Education Minister Dharmendra Pradhan stepped down.  Sarkarnama
देश

CJP News : झुरळ म्हणत हिणवलं, हलक्यातही घेतलं... त्याच 'कॉक्रोच क्रांती'ने शिक्षणमंत्र्यांची खुर्ची हलवली! 2 महिन्यातच फिरवला गेम!

एका मीमपासून सुरू झालेल्या आंदोलनाने देशव्यापी स्वरूप घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत मजल मारली. या घडामोडींमुळे मोदी सरकारच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम झाल्याची चर्चा आहे.

Hrishikesh Nalagune

एका उपरोधिक टिप्पणीतून झालेला अपमान, सोशल मीडियावरील एका मीम पेजची निर्मिती, पुण्यापासून, दिल्लीपर्यंत पेटलेली आंदोलनाची धग आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा घेतलेला राजीनामा...

मागील ३ महिन्यांत घडलेल्या घडामोडींमुळे केंद्रातील मोदी सरकारच्या कणखर प्रतिमेला पहिल्यांदाच तडा गेला. 'कधीही न झुकणारे सरकार' अशी प्रतिमा असलेल्या मोदी सरकारला जनरेटा आणि कायदेशीर-नैतिक दबावामुळे माघार घ्यावी लागली आहे.

पण सुरुवातीला केवळ एक 'मीम' म्हणून हलक्यात घेतलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि या आंदोलनाचा मुख्य चेहरा अभिजित दीपके यांनी ही अशक्यप्राय लढाई कशी जिंकली? जाणून घ्या या ऐतिहासिक संघर्षाची संपूर्ण इनसाइड स्टोरी.

या संपूर्ण जनआंदोलनाची ठिणगी एका कायदेशीर सुनावणीदरम्यान पडली. देशातील बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनांवर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडून एक उपरोधिक टिप्पणी झाली होती.

"काही युवक झुरळांसारखे असतात. त्यांना रोजगार मिळत नाही किंवा कोणत्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. मग त्यांपैकी काहीजण माध्यमांमध्ये जातात, काही सोशल मीडियावर, काही आरटीआय कार्यकर्ते किंवा इतर कार्यकर्ते बनतात आणि मग सर्वांवर टीका करू लागतात."

या वक्तव्यामुळे स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा आणि सुशिक्षित तरुणांचा स्वाभिमान दुखावला गेला. 'मैं हूं कॉकरोच ' म्हणत युवकांनी व्यवस्थेला भंडावून सोडण्याचे एक नवीनच आव्हान स्वीकारले.

अभिजित दीपके यांनी या अपमानाला एक वैचारिक आणि संघटित धार दिली. त्यांनी या अपमानालाच संघर्षाचे सर्वांत मोठे शस्त्र बनवले. त्यांचच कल्पनेतून 'कॉक्रोच जनता पार्टी' हे पेज आणि संघटन अस्तित्वात आले.

उपहास, अभ्यासपूर्ण आकडेवारी आणि सोशल मीडिया मोहिमांच्या माध्यमातून अवघ्या काही आठवड्यांत लाखो बाधित तरुण या चळवळीशी जोडले गेले. अभिजित दीपके यांनी हे आंदोलन केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न ठेवता रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. जंतर-मंतरवर धडकण्यापूर्वी देशातील प्रमुख राज्यांमध्ये आंदोलनाची धग निर्माण केली.

पुणे, मुंबई, नागपूर, जयपूर, बेंगलो, कोलकाता, अमृतसर अशा शहरांमध्ये कॉक्रोचचे वादळ धडकले. या देशव्यापी वातावरणनिर्मितीमुळे आंदोलनाला 'राष्ट्रीय क्रांती'चे स्वरूप प्राप्त झाले आणि दिल्लीतील आंदोलनाची भक्कम पायाभरणी झाली.

अखेर दीपके यांनी दिल्लीमध्ये आंदोलनाला सुरुवात केली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोनम वांगचुक यांनी या आंदोलनात थेट उडी घेतली आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.

वांगचुक यांच्या आगमनामुळे आंदोलनाचे स्वरूप केवळ 'विद्यार्थ्यांचा आक्रोश' न राहता 'सुजाण नागरिकांची क्रांती' बनले. देशातील निवृत्त आयएएस/आयपीएस अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि विचारवंत उघडपणे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले.

दिल्लीसोबतच देशभरातली विविध शहरांमध्ये विद्यार्थी, तरुणांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले, मोर्चे काढले. यामुळे सातत्याने माध्यमांमध्ये आंदोलन चर्चेत राहण्यास मदत झाली.

या दरम्यान, केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. भाजप समर्थक या आंदोलनाला 'राजकीय प्रेरित' ठरवण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलनकर्त्यांची, कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मिडिया अकाऊंट्स हॅक करण्याचे प्रयत्न झाले.

भाजप नेत्यांकडून आणि समर्थकांकडून आंदोलकांना देशद्रोही, दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न सुरु झाला. आंदोलनात हिंदूद्रोही दिसत असल्याचे दावे करण्यात आले. आंदोलनाला फॉरेन फंडिंग असल्याचे आरोप झाले.

त्यानंतरही आंदोलक ठाम राहिले. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. यानंतर दिल्लीतील बंदोबस्त वाढवण्यात आला. अखेरीस संसदेकडे मोर्चा येत असताना तो केरळ भवन येथे अडवण्यात आला. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. अश्रुधुराचा वापर केला गेला.

यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी या आंदोलनात उडी घेतली. काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे या पक्षांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला. विरोधी पक्षांनी एकही दिवस संसदेचे कामकाज चालू दिले नाही.

एका बाजूला अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक तरुण, दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक यांच्यासारखा शांत, अहिंसक आणि नैतिक प्रभाव असलेला चेहरा आणि तिसऱ्या बाजूला विरोधकांची आंदोलकांना मिळालेली मजबूत साथ...या तिहेरी कोंडीमुळे सरकारला अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारणे भाग पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT