shivsena - congress
shivsena - congress Sarkarnama
देश

काँग्रेसचा शिवसेनाला धक्का; एकाच दिवसात काढली राऊतांच्या आवाहनातील हवा

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचे (Goa assembly election) बिगुल वाजले असून ती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसऱ्या बाजूला गोव्यात युती - आघाडीच्या राजकाणानेही वेग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काल शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे सांगितले. तसेच या आघाडीत त्यांनी काँग्रेसलाही (Congress) आमंत्रित केले होते. मात्र आता काँग्रेसने एकाच दिवसात संजय राऊत यांच्या आवाहनातील हवा काढून घेत शिवसेनेला धक्का दिला आहे.

काँग्रेसने आज त्यांची विधानसभा उमेदवारांची ७ नावांची दुसरी यादी जाहिर केली. यापुर्वी काँग्रेसने पहिल्या यादीच ८ जागांवरील आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची स्वतंत्ररित्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसने आता विधानसभेतील ४० जागांपैकी १६ जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. या सोबतच काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाशीही युती केली आहे. त्यामुळे काही जागा गोवा फॉरवर्डसाठीही सोडाव्या लागणार आहे. त्यामुळेच काँग्रेस आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत जाण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आता गोव्याच्या राजकारणात सुरु आहे.

काँग्रेस आज जाहिर केलेल्या यादीत पेडणे मतदारसंघातून अॅड. जितेंद्र गावकर, कुंभारजुवा मतदारसंघातून राजेश फळदेसाई, वाळपोई मतदारसंघातून मनिषा शेणवी उसगावकर, सांताक्रुझ मतदारसंघातून रुदॉल्फ फर्नांडिस, दाबोळीम मतदारसंघातून विरियतो फर्नांडिस, कुठ्ठाळ्ळी मतदारसंघातून ओलांसिओ सिमोईश तर नावेली मतदारसंघातून माजी मंत्री आवेर्तानो फुर्तादो यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

दरम्यान मागच्या आठवड्यातही संजय राऊत आणि गोवा काँग्रेसच्या नेत्यांची गोव्यात एक बैठक पार पडली होती. यात गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करुन या बैठकीबाबत माहिती दिली होती. या बैठकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे संजय राऊत काँग्रेसला सोबत घेण्यास आग्रही असल्याचे दिसून येते, पण काँग्रेस त्यास प्रतिसाद देताना दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT