<div class="paragraphs"><p>pratapsingh rane - Devendra Fadnavis - Goa Election </p></div>

pratapsingh rane - Devendra Fadnavis - Goa Election

 

Sarkarnama

देश

राणेंचा देवेंद्र फडणवीसांना धक्का : 'ती' डिनर डिप्लोमसी वाया जाणार

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Election) धामधूम सुरू आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात सर्वात पुढे काँग्रेस असून पक्षाने उमेदवार यादीही जाहीर केली आहे. अशातच आता गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घोषणा पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी केली आहे. त्यांनी आपलेच पुत्र भाजप (BJP) नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने देखील पर्ये मतदारसंघातून तिकीट जाहीर केले आहे.

प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेस कडूनच आणि ती ही आपल्याच मुलाविरुद्ध निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा आणि पक्षानेही त्यांना तत्परतेने दिलेले तिकीट या सगळ्या घडामोडी गोवा विधानसभा निवडणूकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे प्रतापसिंह राणे यांना भाजपमध्ये आणण्यास मागच्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांचे सुरु असलेले प्रयत्न देखील लपून राहिले नव्हते.

सप्टेंबरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांखळी येथील प्रतापसिंह राणे यांच्या फार्म हाऊसवर जावून रात्रभोजन केले होते. त्यामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस पक्षातही कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर फडणवीसांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’ मधून भाजपला अनेक गोष्टींचा लाभ होईल असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानंतरच प्रतापसिंह राणे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बोलून दाखवली जात होती. मात्र राणे यांनी या आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला होता.

मात्र त्यानंतर प्रतापसिंह राणे यांच्या तिकीटाची विधानसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र आपल्याच पुत्राविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून प्रतापसिंह राणे यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. ते म्हणाले होते की, "काँग्रेसचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती केली आहे. पर्ये मतदारसंघातून मी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळे मी याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे."

प्रतापसिंह राणे हे दहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री होते. आता त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राजकीय भूकंप घडवला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली आहे. मुलाचा मतदारसंघ असलेल्या पर्ये मतदारसंघातून ते थेट आव्हान देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT