Congress-BJP News
Congress-BJP News Sarkarnama
देश

विधान परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का; काँग्रेसने विजय नोंदवून रचला इतिहास

सरकारनामा ब्यूरो

बंगळूरू : दक्षिण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) काँग्रेस (Congress) पक्षाने मतदारसंघातून प्रथमच विजय नोंदवून इतिहास रचला. काँग्रेसचे उमेदवार मधु मादेगौडा (Madhu Madegauda) यांनी भाजपचे (BJP) एम. व्ही. रविशंकर (M.VRavishankar) यांचा पराभव केला. तब्बल २९ तासाच्या मतमोजणीनंतर अधिकाऱ्यांनी निवडणूक निकाल गुरुवारी (ता.१६ जून) दुपारी जाहीर केला. या निकालाबरोबर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला. धर्मनिरपेक्ष जनता दलाला मात्र या निवडणुकीत धक्का बसला. (Legislative Council elections Latest Marathi News)

प्राधान्य मतांच्या मोजणीनंतर मादेगौडा यांना ४५ हजार २७५ मते मिळाली. भाजप उमेदवाराला ३३ हजार ८७८ मते मिळाली. धजदचे उमेदवार एच. के. रामू यांना १९ हजार ३६० मतांसह तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. १५ जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीच्या सुमारे २९ तासांनंतर मादेगौडा यांना औपचारिकरित्या विजयी जाहीर केले. प्रादेशिक आयुक्त जी. सी. प्रकाश यांनी १६ जून रोजी दुपारी मतमोजणी केंद्रावर मादेगौडा यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.

म्हैसूर, मंड्या, हसन आणि चामराजनगर जिल्ह्यात पसरलेल्या दक्षिण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. एकूण एक लाख ४१ हजार ९६३ मतदारांपैकी ९९ हजार ३०४ मतदान झाले.

धजदसाठी हा मोठा धक्का मानला जातो. जून २०१६ मध्ये झालेल्या मागील निवडणुकीत पक्षाने विजय मिळवला होता. विद्यमान आमदार के. टी. श्रीकांतेगौडा यांनी उमेदवारी दिली नाही. तर पक्षाने कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे ऱ्यांच्या माजी अध्यक्ष एच. के. रामू यांना उमेदवारी दिली.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण यांनी या विजयाचे श्रेय पक्षाने अवलंबलेल्या सुव्यवस्थित प्रचार धोरणाला दिले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे त्यांनी आभार मानले. ध्रुवनारायण यांनी धजदचे विधान परिषद सदस्य मरितिब्बेगौडा यांनी काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने उघडपणे प्रचार केल्याबद्दलही आभार मानले.

पंतप्रधान मोदींना काँग्रेसची ‘भेट’

ध्रुवनारायण यांनी हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष ‘भेट’ असल्याचे म्हटले आहे. मोदी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी म्हैसूर येथे येणार आहेत. पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी पंतप्रधानांना हि ‘विशेष भेट’ दिली असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT