Devendra Fadnavis Sarkarnama
देश

Devendra Fadnavis On Congress : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, "काँग्रेस हटाओ..."

Rajasthan Assembly Election : सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेसची महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा, तर राज्यस्थानात भाजपची परिवर्तन संकल्प यात्रा

उत्तम कुटे

Delhi Political News : लोकसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक ही मुदतपूर्व म्हणजे येत्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्तापरिवर्तन करण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरु आहे. तर, डिसेंबरमध्येच विधानसभेची निवडणूक राज्यस्थात होणार आहे. तेथील काँग्रेसची सत्ता उलथवण्यासाठी भाजप आतापासूनच जोरात तयारीला लागली आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल केलेले भाजपचे धुरंधर नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी राज्यस्थानात मंगळवारी डेरेदाखल झाले. (Latest Political News)

भाजप राज्यस्थानचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रभारी असून त्यांनी तेथे पोचताच पहिल्या दिवशी प्रचाराचा धडाकाच लावला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने जनसंवाद यात्रा तर भाजपने राज्यस्थानात परिवर्तन संकल्प यात्रा आरंभली आहे. सूरजपोळ विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दुपारी पहिली जाहीर सभा घेतली. यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांनी जैतारण, ब्यावर आणि पाली अशा चार ठिकाणी सभा झाल्या. सायंकाळी रोड शो ही पार पडला. प्रत्येक ठिकाणी ते हिंदू धर्म की जय, गोमाता की जय, भारत माता की जय अशा घोषणा देऊन आपल्या भाषणाची सुरुवात करीत होते. या संकल्प यात्रेतील जाहीर सभांमधून फडणवीस विरोधकांवर तुटून पडले.

राज्यस्थानातील काँग्रेसच्या सरकारवर फडणवीसांनी यावेळी तोफ डागली. 'काँग्रेस हटाओ, राजस्थान बचाओ,' अशी घोषणा त्यांनी दिली. मोदींनी केलेल्या कामांचा पाढा त्यांनी या सभांत वाचला. राज्यस्थानला घराघरात पाणी देण्यासाठी मोदी सरकारने दिलेला ३० हजार कोटी रुपयांचा निधी कुठे गेला, अशी विचारणा त्यांनी राज्यातील गहलोत सरकारला केली. घराघरात पाणी पोचले नाही, हा पैसा काँग्रेस नेत्यांनी खाऊन टाकला, असा आरोप त्यांनी केला. सभेला झालेल्या गर्दीचा उल्लेख करीत राज्यात निश्चीत परिवर्तन होईल, असा दावा त्यांनी केला. (Maharashtra Political News)

काँग्रेसला (Congress) सनातन धर्माची ताकद दाखविण्याची गरज असल्याचे फडणवीसांनी ब्यावर येथील सभेत सांगितले. 'वीर छत्रपती शिवाजी महाराज की धरती से महाराणा प्रताप को नमन करने आया हूं,' असे ते यावेळी म्हणाले. काँग्रेसच्या कुशासनातून राज्यस्थान आता मुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या राज्यात भाजपची त्सुनामी येईल, डबल इंजिनचे सरकार येईल, असा मोठा दावाही त्यांनी केला. मोदींचे गुणगान करताना त्यांनी खासदार राहुल गांधी आणि विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर तोफ डागली. यावेळी भाजपच्या राज्यस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकरही उपस्थित होत्या.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा चिघळला आहे. यातच ओबीसी, धनगर समाजही आरक्षणाबाबत आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री या नात्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था चिळघळण्याची शक्यता लक्षात घेऊन फडणीसांनी राज्यात लक्ष घालणे अपेक्षित आहे. मात्र ते राज्य वाऱ्यावर सोडून राजस्थानच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांना राज्यातील प्रश्नांची चिंता नाही, असा गंभीर आरोप राज्यातील विरोधकांनी करून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT