Bhai Jagtap Latest Marathi News, Hitendra Thakur Latest Marathi News, MLC Election News
Bhai Jagtap Latest Marathi News, Hitendra Thakur Latest Marathi News, MLC Election News Sarkarnama
देश

विरारचे ठाकूर कुणाचं गणित बिघडवणार? मित्राची भेट घेत ‘भाईं’नी घातलं साकडं

सरकारनामा ब्युरो

विरार : राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दहा जागांसाठी भाजपचे पाच आणि महाविकास आघाडीचे सहा असे अकरा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपसह काँग्रेसला विजयासाठी मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यामुळे विरारचे ठाकूर पुन्हा एकदा राजकीय आखाड्याच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यासाठी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी मंगळवारी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्याकडे धाव घेतली. (Bhai Jagtap Latest Marathi News)

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मते मिळवण्यासाठी भाई जगताप यांनी मंगळवारी ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकले नाही. परंतु ठाकूर आणि जगताप यांनी आमचे मैत्रीचे जुने संबंध असल्याचे सांगितले.

हितेंद्र ठाकूरांसह, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळावी, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी 10 मते कमी पडतात. त्यासाठी जगताप यांनी मंगळवारी विरार गाठलं. राज्य सभेच्यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीत पडल्याने यावेळी आता पासूनच महाविकास आघाडीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

भाई जगताप आणि ठाकूर यांच्यात तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी नंतर भाई जगताप यांनी सांगितले की, हितेंद्र ठाकूर हे जुने मित्र आहेत. मैत्रीच्या गप्पा झाल्यानंतर मी निवडणुकीला उभा असून मला मदत करा, अशी विनंती त्यांना केली. भाजपाने एक नवीन संस्कृती जन्माला आणली आहे. आतापर्यंत बिनविरोध निवडणुका होत होत्या. परंतु भाजप आता पैश्याच्या जोरावर निवडणुका जिंकत आहे, असा आरोप जगताप यांनी केला.

निवडणुकीला मदत करण्यासाठी भाई जगताप यांनी सांगितल्याचे हितेंद्र ठाकूर म्हणाले. सर्वाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं सांगून ठाकूर यांनी आपली भूमिका यावेळीही गुलदस्त्यात ठेवली. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत कुणाला मतदान केलं किंवा करणार याबाबत ठाकूर यांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ठाकूरांनी भाजपला मतदार केल्याचे सांगितले आहे. त्यावरून ठाकूरांनी त्यांच्यावर टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT