Congress crisis : मागील काही वर्षांत काँग्रेसला विविध राज्यांमध्ये अनेक धक्के बसले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही पक्षाला आसाममध्ये मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी रामराम ठोकला असून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर काल मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती असे बोरा यांनी सांगितले होते. सरमा हे काँग्रेसमध्ये असताना आपण त्यांच्यासोबत २२ वर्षे काम केले आहे. मी पक्षाला ३२ वर्षे दिली आहेत. त्यावेळी सोबत केलेल्या कामांवर चर्चा झाल्याचे बोरा यांनी सांगितले होते.
त्यानंतर आज बोरा हे मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले अन् त्यांच्या भाजपमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. ते २२ फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करतील. सरमा आणि बोरा यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. यावेळी बोरा यांनी आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार गौरव गोगोई यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
बोरा म्हणाले, आसाममधील काँग्रेसची धुरा गौरव गोगोई यांच्याकडे नव्हे तर आसाममधील धुबरीचे काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसेन यांच्याकडे आहे. गौरव गोगोई यांच्याकडे पक्षाचे कोणतेही नियंत्रण उरलेले नसून ते केवळ नामधारी असून, राज्यात काँग्रेसचे सर्व निर्णय रकीबुल हुसेन हेच घेतात.
मी माझा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे पाठवल्यानंतर राहुल गांधी यांनी फोन करून २००७ पासूनच्या संबंधांची आठवण काढली, मात्र राजीनाम्याबाबत ते एक शब्दही बोलले नाहीत, असेही बोरा यांनी सांगितले. ‘आसाम संमिलित मंच’चे माजी अध्यक्ष असलेले बोरा म्हणाले, २०२४ मधील पाच विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांपूर्वी ‘बेहाली’ची जागा भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी लेनीनवादी) यांना देण्याचा निर्णय झाला होता; परंतु काँग्रेसने तो प्रस्ताव मान्य केला नाही.
अखेरीस काँग्रेसने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली तो पक्षाचा सदस्यही नव्हता आणि निवडणुकीत पराभूतही झाला. या प्रकरणामुळे मी आघाडीच्या प्रमुखपदाचा नैतिक जबाबदारीने राजीनामा दिला. काँग्रेसच्या बैठकीतही या मुद्द्यावर अपमान सहन करावा लागला, असा आरोप बोरा यांनी केला. त्यामुळे आता आसाम काँग्रेसला निवडणुकीआधी मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.