अमृतसर : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचा (Punjab Election 2022) प्रचार आता शिगेला पोहचला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी रविवारी राज्यात प्रचारात धुराळा उडवून दिला. पण प्रचार सभेदरम्यान प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांची नाराजी पुन्हा दिसून आली. मुख्यमंत्रिपदासाठी चरणजितसिंग चन्नी (CharanJit Singh Channi) यांच्या नावाची घोषणा केल्यापासून ते नाराज आहे. रविवारी प्रियांका गांधी यांच्या सभेतही सिध्दू यावरून नाराज असल्याचे स्पष्ट झाले.
प्रियांका गांधी यांच्या सभेत सिध्दू व्यासपीठावर उपस्थित राहिले, पण त्यांनी चक्क भाषण करण्यास नकार दिला. आपल्या या कृतीतून त्यांनी प्रियांका गांधी यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) याचीच चर्चा रंगली आहे. सिध्दू यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणीही त्यांचीच होती.
पंजाबसाठी (Punjab) त्यांनी आपला अजेंडाही मांडला आहे. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांचा पत्ता कट केला. तेव्हापासून ते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सिध्दू यांना प्रियांका गांधी यांचे कट्टर समर्थक मानले जाते. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरोधानंतरही प्रियांका यांच्या सांगण्यावरून सिध्दूंना पक्षात एन्ट्री देण्यात आली होती. त्यामुळे सिध्दू यांनी रविवारी त्यांच्यासमोरच आपली नाराजी व्यक्त केल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, या प्रचार सभेत प्रियांका यांनी चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला बहुमत देण्याचं आवाहन मतदारांना केलं. यावेळी त्यांनी आपवरही जोरदार प्रहार केला. इथे आलेल्या एका पक्षाने दिल्ली मॉडेल दाखवलं आहे. याआधीही देशात गुजरात मॉडेल आलं होतं. पण ते नापास झाले. गुजरात मॉडेल केवळ जाहिरातींमध्येच आहे. दिल्लीची स्थितीही वेगळी नाही. दिल्लीत आपने काहीच केलं नाही.
पंजाबमध्ये अमरिंदरसिंग हे दिल्लीच्या इशाऱ्यावर चालत होते. त्यामुळे पक्षाने त्यांना बदललं. आता पंजाब सरकार चालवण्यासाठी पक्षाने गरिब कुटुंबातील चन्नी यांना प्रमुख म्हणून निवडलं आहे. पंजाबची सरकार पंजाबमधूनच चालायला हवी, असं आम्हाला वाटतं. आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर ते दिल्लीतून चालेल, असे प्रियांका यांनी भाषणादरम्यान सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.