House of Salman Khurshid 
देश

सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्लाबोल; भाजप कार्यकर्त्यांकडून जाळपोळ अन् दगडफेक?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नैनीताल येथील घराची सोमवारी जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच घरावर दगडफेक करण्यात आल्याचा दावाही खुर्शीद यांनी केला आहे. ही जाळपोळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा केला जात आहे. खुर्शीद यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या काही व्हिडीओमध्ये भाजपचा (BJP) झेंडा हातात घेतलेला कार्यकर्ता दिसत आहे.

खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकातील मजकूरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाविरोधात भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी खुर्शीद यांच्यासह काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे. हे पुस्तक मागे घेण्याची मागणीही केली जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून खुर्शीद यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

सोमवारी नैनीताल येथील खुर्शीद यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली. तसेच दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. याबाबतचे काही व्हिडीओ व छायाचित्र खुर्शीद यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहेत. या घटनेनंतर मी अजूनही चूक आहे का, हे हिंदूत्व असू शकतं का, असे सवाल खुर्शीद यांनी उपस्थित केले आहेत. माध्यमांशी बोलतानाही खुर्शीद यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मला हिंदू धर्माचा गर्व आहे. पण जाळपोळीच्या घटनेने मी बरोबर असल्याचे सिध्द केले आहे. अशा लोकांचं हिंदू धर्माशी काहीच देणंघेणं नाही. हा हल्ला माझ्यावर नसून हिंदू धर्मावर आहे. माझ्या पक्षाने माझे समर्थन केलं आहे. पक्षश्रेष्ठींनी मला बरोबर म्हटलं आहे. माझे दरवाजे चर्चेसाठी नेहमीच खुले आहेत, अशी प्रतिक्रिया खुर्शीद यांनी दिली आहे.

या घटनेवर काँग्रेसचे नेते शशी शरूर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. खुर्शीद यांनी नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावली आहे. तसेच देशाच्या उदारमतवादी, मध्यममार्गी आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनालाही त्यांनी देशात नेहमीच प्राधान्य दिले आहे. आपल्या राजकारणातील वाढत्या असहिष्णुतेचा सत्ताधाऱ्यांनी निषेध करायला हवा, असे ट्विट शरूर यांनी केले आहे.

दरम्यान, खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्याचा दावा हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे. तर खुर्शीद यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. यावरूनच देशभरातील हिंदूत्ववादी संघटनांनी खुर्शीद यांना लक्ष्य केलं आहे. त्यातूनच सोमवारची घटना घडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT