Congress  Sarkarnama
देश

Congress news : दक्षिणेत काँग्रेसमध्ये फूट; शिवकुमारांच्या शपथविधीला दांडी, बड्या नेत्याने वादग्रस्त मुद्यालाच घातला हात

Mekedatu project controversy, DK Shivakumar news : आता तामिळनाडू काँग्रेसने मेकेदातू प्रकल्पाविरोधात आवाज उठविला असून थेट शिवकुमार यांनाच आव्हान दिले आहे.

Rajanand More

Karnataka Tamil Nadu dispute : काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेऊन २४ तास उलटण्याआधीच दोन राज्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. एका प्रोजेक्टच्या मुद्द्यावरून तमिळनाडूतील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी राज्याच्या हक्कांबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट करत थेट शिवकुमार यांनाच विरोध केला आहे.

तमिळनाडूतील काँग्रेसच्या नेत्यांनी शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला दांडी मारल्याने हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. मागील काही वर्षांपासून कावेरी पाणीवाटपाचा वाद सुरू आहे. त्यातच मेकेदातू धरण प्रकल्पावरून कर्नाटक आणि तमिळनाडूमध्येही जोरदार वाद सुरू झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित कर्नाटकच्या प्रकल्पाला विरोध केला आहे.

आता तामिळनाडू काँग्रेसनेही प्रकल्पाविरोधात आवाज उठविला असून थेट शिवकुमार यांनाच आव्हान दिले आहे. पक्षाचे तमिळनाडूतील खासदार मणिकम टागोर म्हणाले, पक्ष मेकेदातू प्रोजेक्टच्या अनुषंगाने तामिळनाडूच्या हक्कांबाबत तडजोड करणार नाही. या प्रकल्पाविषयीच्या शिवकुमार यांच्या भूमिकेमुळे आम्ही त्यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिलो नाही.

मेकेदातू प्रकल्पाविरोधात तामिळनाडू सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका नुकतीच सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. शिवकुमार यांनी हा निकाल आल्यानंतर कर्नाटकसाठी 'गुड न्यूज' अशी प्रतिक्रिया दिली होती. आता हा मुद्दा केंद्र सरकारच्या हातात असेल. कर्नाटक सरकारकडून सुधारित प्रकल्प अहवाल केंद्राला सादर केला जाईल. यापार्श्वभूमीवर तमिळनाडूतून विरोध होऊ लागला आहे.

नेमका प्रोजेक्ट काय आहे?

तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर मेकेदातू येथे कर्नाटक सरकारकडून कावेरी नदीवर धरण बांधले जाणार आहे. बेंगलुरू आणि परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच वीज निर्मितीसाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे तामिळनाडूचा हिस्सा कमी होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, तामिळनाडूने या प्रकल्पामुळे शेतीसाठीचा पाणी प्रश्न निर्माण होईल, असा सांगत विरोध केला आहे. कावेरीच्या पाण्यावर अवलंबून अन्य राज्यांशी चर्चा न करता प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचाही आरोप होत आहे. तमिळनाडूतील काँग्रेस नेतेही प्रकल्पाविरोधात उभे ठाकले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT