BJP and Congress  Sarkarnama
देश

काँग्रेसचा आमदार भाजपच्या वाटेवर? स्थापना दिनाला हजेरी लावून दिला धक्का

भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या आमदाराने हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

पणजी : संपूर्ण देशभरात भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेस आमदाराने या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात हा पहिल्यांदाच निवडून आलेला काँग्रेस आमदार सहभागी झाला होता. याचबरोबर त्याने काही काळ भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबरोबरही गुफ्तगू केले. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पणजीतील भाजपच्या मुख्यालयात स्थापना दिनाचा हा कार्यक्रम झाला. या वेळी काँग्रेसचे (Congress) आमदार राजेश फळेदेसाई (Rajesh Faldessai) हे उपस्थित होते. त्यांना पाहून अनेक भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. फळदेसाई हे कुंभारजुवे मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत फोटोही काढून घेतले. या तिघांनी एकत्रितपणे छायाचित्रकारांना पोझ दिली. त्यावेळी तिघांमध्ये काही काळ चर्चा झाली. भाजपचे संघटन सचिन सतीश धोंडही उपस्थित होते. यामुळे फळदेसाई हे काँग्रेसला धक्का देऊन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) अध्यक्ष पांडुरंग ढवळीकर, मगोपचे आमदार जीत अरोळकर हेसुद्धा उपस्थित होते. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही हजेरी लावली होती. मगोपला मंत्रिपद मिळणार का, यावर बोलताना ढवळीकर म्हणाले की, आम्ही भाजपला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही पाठिंबा दिला.

गोव्यात भाजपने (BJP) सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या गळ्यात टाकली आहे. सावंत यांच्यासह 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. यात विश्वजीत राणे (Vishwajit Rane), मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र भाजपकडून यात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. गोव्याच्या मंत्रिमंडळात अजून काही जागा शिल्लक आहेत. यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि अपक्षांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT