Congress Manipur News : देशात पुढील वर्षी पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार असून त्यामध्ये मणिपूरचाही समावेश आहे. याच राज्यातील एका काँग्रेस खासदाराने विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. या खासदारावर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे.
मणिपूरमधील खासदार अंगोमचा बिमोल अकोइजम यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील कीशामथोंग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीबाबत राज्य काँग्रेसचे अध्यक्ष ओ. इबोबी यांच्याशी चर्चा झाल्याचेही अकोइजम यांनी सांगितले.
अकोइजम हे मागील काही महिन्यांपासून वादात अडकले आहे. भाजपकडून त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे. भाजपकडून दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले आहे.
जेएनयू विद्यापीठातील ११ हून अधिक विद्यार्थिनींनी अकोइजम यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. ते विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. या तक्रारींनंतर त्यांना ९ ऑक्टोबर रोजी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी केली जात असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
अकोइजम यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते राजकीय असल्याचे म्हटले आहे. राजकीय विरोधातून हे आरोप करण्यात आले आहे. आपण ईशान्य भारतातील असल्याने आपल्याशी दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप अकोइजम यांनी केला आहे. काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित करावे, अशी जोरदार मागणीही भाजपकडून केली जात आहे. अद्याप पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यातच आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.