Kalyan Kale Sarkarnama
देश

Video Kalyan Kale : लोकसभेत कल्याण काळे थांबेनात, अध्यक्षही थकले; शेवटी माईक बंद करावा लागला...

Rajanand More

New Delhi : लोकसभेत अर्थसंकल्पातील कृषीविषयक तरतुदींवर बोलताना काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांची पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी फिरकी घेतली. जवळपास सहा मिनिटांच्या भाषणात चार-पाचवेळा थांबण्यास सांगूनही ते न थांबल्याने त्यांचा माईक बंद करावा लागला.

खासदार काळे सोमवारी लोकसभेत दुपारी तीन वाजून 34 मिनिटांनी बोलण्यासाठी उठले. चार मिनिटे बोलल्यानंतर पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी बेल वाजवून त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यावर काळे यांनी मी दूध, शेतकऱ्यांवर, पहिल्यांदाच बोलतोय, आणखी थोडावेळ बोलू द्या, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

सैकिया यांनी पुन्हा त्यांना भाषण थांबवण्यास सांगितले. पण एकच मुद्दा राहिल्याचे सांगत काळे बोलतच राहिले. काही सेकंदानंतर सैकिया यांनी त्यांना थांबण्यास सांगत दुसऱ्या सदस्याचे नाव पुकारले. पण काळे काही थांबले नाहीत. जाता-जाता एकच बोलतो, असे काळे म्हणताच मग सैकिया यांनीही त्यांची फिरकी घेतली.

कुठे जाणार तुम्ही, इथेच राहणार ना?, असे पीठासीन अधिकाऱ्यांनी म्हणताच लोकसभेत उपस्थित सदस्यांमध्ये हशा पिकला. पण त्याचा काहीच फरक काळे यांच्या भाषणावर पडला नाही. ते बोलतच राहिले. अखेर 3 वाजून 40 मिनिटांनी काळे यांचा माईक बंद करावा लागला. त्यानंतर दुसरे सदस्य बोलण्यासाठी उभे राहिले. पण काळे आपला मुद्दा पूर्ण करूनच जागेवर बसले.  

दरम्यान, काळे यांनी कृषी खात्याशी संबंधित विविध मुद्दयांवर आपले म्हणणे मांडले. राष्ट्रीय गोकुळ मिशनसाठी अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. लम्पी आजारामुळे देशभरात सुमारे दोन लाख जनावरांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात अनेकदा दुष्काळ पडतो. या भागात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी दुध व्यवसायाच्या माध्यमातून सरकारने क्लस्टर करावे. दहा गायींचे एक यूनिट शेतकऱ्यांना दिले तर त्याचा फायदा होईल. दुधातील भेसळ, दुध पावडरचा मुद्दाही काळे यांनी मांडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT