Congress Working Committee Meeting  
देश

कार्यकारी बैठकीत वादळ : सोनिया गांधींच्या आक्रमक भूमिकेपुढे नेते निरुत्तर

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत विरोधकांना थेट फैलावर घेत त्यांना निरूत्तर केले.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा (president) तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र होते. पक्षाच्या कार्यकारी समितीची (CWC) बैठकीत आज नवीन अध्यक्ष निवडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. असे असले तरी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षांतर्गत विरोधकांना थेट फैलावर घेत त्यांना निरूत्तर केले.

बैठकीत बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, तुम्ही मला बोलू दिले तर मी असे सांगेन की मीच पक्षाची पूर्णवेळ अध्यक्ष आहे. मी अनेक प्रश्न हाती घेऊन ते पंतप्रधानांसमोर मांडत आहे. डॉ.मनमोहनसिंग आणि राहुल गांधींसह अनेक नेत्यांशी मी सातत्याने चर्चाही करीत असते. राष्ट्रीय मुद्दे आणि संसदेतील रणनीती यावरही आमची चर्चा होत असते.

मी मोकळेपणे बोलण्याचा कायम प्राधान्य दिले आहे. परंतु, यासाठी प्रसारमाध्यमांसमोर जाऊन बोलण्याची आवश्यकता नाही. पक्षासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी येथेच प्रामाणिक आणि खुली चर्चा करा. या चार भिंतीच्या आत चर्चा होऊन बाहेर जातील ते केवळ फक्त कार्यकारी समितीचे निर्णय असतील, अशी तंबीही त्यांनी दिली. त्यांचा रोख जी-23 गटांतील नेत्यांकडे होता, असे सूत्रांनी सांगितले.

कोरोना संकट सुरू झाल्यानंतरची काँग्रेस कार्यकारी समितीची पहिली बैठक आज झाली. अध्यक्षपदासह संघटनात्मक फेरबदलाची मागणी जी-23 या नेत्यांच्या गटाने केली होती. या मागणीवर चर्चा करुन पक्षातील फेरबदल पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. त्याआधी पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीला कार्यकारी समितीचे 57 सदस्य उपस्थित होते. यात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि जी-23 मधील काही नेते उपस्थित होते. जी-23 नेत्यांच्या गटाच्या काही मागण्या आजच्या बैठकीत मान्य झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT