Women Reservation and Delimitation : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातही विरोधकांच्या आंदोलनामुळे कामकाजाची कोंडी कायम आहे. संसदेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी तीन वेळा चर्चा केल्याचे समोर आले आहे.
मात्र, चर्चेनंतरही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, सत्ताधारी भाजपकडून विशेष अधिवेशनाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसने आपल्या खासदारांना दिल्ली सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. भाजपकडूनही (BJP) खासदारांना दिल्लीमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संसदेतील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता राहुल गांधी आणि किरेन रिजिजू यांच्यात सोशल मीडियावरून शाब्दिक संघर्ष पाहायला मिळत आहे. या वादाचे निमित्त ठरले आहे ते महिला आरक्षण विधेयक.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर महिलांच्या अभिव्यक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करणारा व्हिडिओ शेअर केला. देशाच्या प्रगतीसाठी महिलांना स्वतःला व्यक्त करण्याची आणि स्वप्ने पाहण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. “भारताच्या महिलांमधील ऊर्जा दडपून ठेवली गेली आहे. तिला व्यक्त होऊ दिले जात नाही. तिला स्वप्न पाहू दिले जात नाही,” असे राहुल गांधी यांनी म्हटले. महिलांच्या अभिव्यक्तीशिवाय देशाची प्रगती अपूर्ण राहील, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
राहुल गांधी यांनी पुढे महिलांच्या अभिव्यक्तीचा मुद्दा आपल्या राजकारणाशी जोडला. देशातील राजकारण नेमके कशासाठी असले पाहिजे, हे सांगताना महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांच्या या व्हिडिओवरून भाजपचे किरेन रिजिजू यांनी त्या व्हिडिओवरून राहुल गांधी यांना टॅग करत, टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी यांच्या या पोस्टवर किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’वरून प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांना टॅग करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेतील बदलाकडे लक्ष वेधले. “काँग्रेस पक्षाकडून आलेला हा सकारात्मक संदेश दिसत आहे. महिलांबाबत राहुल गांधीजींच्या भूमिकेत बदल झालेला स्पष्टपणे जाणवत आहे,” असे म्हणत रिजिजू यांनी चाचपणी केली. तसेच, काँग्रेस महिला आरक्षण विधेयकाला कोणतीही अट न घालता पाठिंबा देईल, अशी अपेक्षा रिजिजू यांनी व्यक्त केली.
रिजिजू यांच्या या अपेक्षेवर राहुल गांधी यांनी पुन्हा ‘एक्स’वरून उत्तर देत पाणी फिरवले. महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले. संसदीय कार्यमंत्री म्हणून महिला आरक्षण विधेयकाबाबतची वस्तुस्थिती रिजिजू यांच्यापेक्षा अधिक चांगली कोणाला माहिती असेल, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
“महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच काँग्रेसच्या पूर्ण पाठिंब्यासह सर्वसंमतीने मंजूर झाले आहे. प्रश्न असा आहे की, तीन वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी का झाली नाही? आणि आता तुम्ही त्याचा परिसीमेशी विनाकारण संबंध का जोडू इच्छिता?” असा सवाल राहुल गांधी यांनी केला. यासोबतच त्यांनी “2023 मध्ये मंजूर झालेला कायदा लागू करा. कोणतीही अट न घालता,” अशी मागणी केली.
राहुल गांधी यांनी या सोशल वाॅरमधून सत्ताधारी भाजप अधिवेशनात काय खेळी करेल, याचा अंदाज घेतल्याचे बोलले जात आहे. महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी आणि परिसीमन यांचा संबंध हा सध्या राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. दुसरीकडे, रिजिजू यांनी काँग्रेसने महिला आरक्षणाला कोणतीही अट न घालता पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे संसदेतील कोंडीच्या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण विधेयकावरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष सोशल मीडियावरही तीव्र होताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.