Riya Ahir alleges harassment Sarkarnama
देश

Riya Ahir : राहुल गांधींसमोर मुंबईची रिया अहिर भावूक; 'माझ्यावर अश्लील पोस्ट, धमक्या... पोलिसांनी FIRही दिली नाही'

NEET protester Riya Ahir alleges online harassment before Rahul Gandhi : दिल्लीतील संयुक्त पत्रकार परिषदेत NEET आंदोलनातील विद्यार्थिनीचे आरोप; शिक्षण व्यवस्थेवर राहुल गांधींची टीका.

Pradeep Pendhare

Rahul Gandhi meets NEET protest students : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत नीट (NEET) पेपरफुटी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या बैठकीत मुंबईतील विद्यार्थिनी रिया अहिर हिने सोशल मीडियावरील कथित छळ, धमक्या आणि पोलिसांकडून कारवाई न झाल्याबाबत गंभीर आरोप करत माध्यमांसमोर भावनिक आवाहन केले.

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मुंबईची (Mumbai) रिया अहिर म्हणाली, "माझ्यावर सोशल मीडियावरून सातत्याने हॅरेसमेंट होत आहे. हे केवळ ट्रोलिंग नाही, तर हा गुन्हाच आहे. काही पक्षांचे कार्यकर्ते माझ्याविषयी अत्यंत अश्लील, खालच्या पातळीवरील पोस्ट आणि कमेंट्स फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. माध्यमांनी या गंभीर परिस्थितीवर आवाज उठवावा."

रिया अहिरने सांगितले की, दादर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत ती पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिली होती. "बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या (Police) ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न करणे हा काही गुन्हा नाही. मात्र, त्यानंतर मला लक्ष्य करण्यात आले," असा दावा तिने केला.

रिया अहिरच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावरील कथित छळासंदर्भात तिने 27 जुलै रोजी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्यापही त्या तक्रारीवर FIR नोंद झालेली नसल्याचा दावा तिने केला. "मुलींना शिक्षण घेऊ दिले जात नाही आणि त्यांचे संरक्षणही केले जात नाही. देशाच्या नागरिक म्हणून माध्यमांनी सत्याच्या बाजूने उभे राहावे," असे आवाहनही तिने केले.

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीसह देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले.

विद्यार्थी आंदोलकांकडून संविधानाचे रक्षण

राहुल गांधी म्हणाले, "काही युवा आंदोलकांवर हल्ले करण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली आणि धमकावण्यात आले. या विद्यार्थ्यांनी संविधानाचे संरक्षण केले, भारताच्या संकल्पनेचे रक्षण केले आणि देशाच्या भविष्यासाठी आवाज उठवला. त्यांचा मला अभिमान आहे."

प्रश्न उपस्थित करणे गुन्हा नाही

ते पुढे म्हणाले, "शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा नाही. आजची शिक्षण व्यवस्था सदोष, ढासळलेली आणि निष्प्रभ झाली आहे. या व्यवस्थेत सुधारणा व्हावी, हीच विद्यार्थ्यांची मागणी आहे. आंदोलकांनी कोणताही हिंसाचार केला नाही, तरी त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आणि त्यांना धमकावण्यात आले."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT