Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge sarkarnama
देश

पाच राज्यात भुईसपाट केल्यानंतर मोदी देणार कॉग्रेसला आणखी मोठा धक्का

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केले आहे. उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले. पंजाबमध्ये काँग्रेसचा ‘झाडू’ने धुव्वा उडवला.

‘आप’ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसवरील (Congress)संकटाची मालिका कमी होण्याचे चित्र दिसत नाही. कारण संसदेत मोदी सरकारकडून (Narendra Modi)कॉग्रेसला अजून एक मोठा झटका मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वरिष्ठ सभागृहातही कॉंग्रेसची अवस्था दयनीय होणार आहे. कॉग्रेस पक्षाची संख्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक त्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. या स्थितीत नरेंद्र मोदी सरकार कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद ठेवेल याची सुतराम शक्यता नाही. २०१४ पासूनची ५ वर्षे हुलकावणी देणाऱया विरोधी पक्षनेतपदाचा अलीकडेच लाभ झालेले वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांचा आणखी ‘मूड आॅफ' होणार याची दाट शक्यता आहे.

राज्यसभेतील सध्या कॉंग्रेसचे संख्याबळ ३४ पर्यंत घटले आहे. त्यामुळे हा पक्ष विरोधी पक्षनेत्यासाठीच्या सदस्य संख्येच्या अगदी जवळ येईल. यंदा कॉंग्रेस किमान ७ जागा गमावण्याची चिन्हे आहेत. आता गुजरात व पुढील वर्षी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा धुव्वा उडाला तर कॉंग्रेसची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची खुर्चीही जाईल.

आपने पंजाबात प्रचंड विजय मिळवून दिल्लीतील विजयाची पुनरावृत्ती केली. त्यानंतर केजरीवाल यांच्या पक्षाला राज्यसभेतही लॉटरी लागणार आहे. सध्या संजय सिंह हे राज्यसभेतील आपचा तोफखाना सांभाळतात. त्यांना पंजाबातून आणखी किमान ५ खासदारांचे बळ मिळेल. पंजाबात यावर्षी दोन टप्प्यांत ५ राज्यसभा जागांसाठी निवडणूक होत आहे. कॉंग्रेसचे प्रतापसिंग बाजवा व शमशेरसिंग डुलो, अकाली दलाचे सुखदेवसिंग ढींढसा व नरेश गुजराल और भाजपचे श्वेत मलिक यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. यातील एकही सदस्य पंजाबातून पुन्हा राज्यसभेत दिसण्याची शक्यता नाही. ढिंढसा यांनी भाजपशी युती केली होती.

या महिनाअखेर ज्या १३ जागांसाठी निवडणूक होत आहे.आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नगालैंड व त्रिपुरा येथील सदस्य निवृत्त होतील. त्यातील केरळ वगळता अन्य राज्यांतून भाजप व आपचे जास्तीत जास्त सदस्य राज्यसभेवर निवडून येतील.

२४३ संख्येच्या राज्यसभेत भाजपचे सध्या ९७ सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीत बंपर विजयाचे पीक घेणारा हा पक्ष राज्यसभेत शंभरीपार जाण्याची शक्यता आहे. यात नजिकच्या काळात आणखी ७ जागांची भर पडेल व २०२२ च्या अखेरीस भाजपचे बळ किमान १२३ जागांवर जाणार आहे. उत्तर प्रदेशातील ३, आसाम, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधील कॉंग्रेसच्या प्रत्येकी एकेक जागा भाजप हिसकावून घेईल.

संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमत नसण्यामुळे सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला असणारा ‘सल' दूर होण्याचा दिवस विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी आणखी नजिक आणला आहे. उत्तर प्रदेशासह ४ राज्यांतील विजयामुळे राज्यसभेत भाजप याच महिन्याच्या अखेरीस शतक ओलांडेल व वर्षभरात हा पक्ष त्या पदासाठी लागणाऱया १० टक्के जागांच्या अगदी जवळ येईल. दुसरीकडे पंजाबात ऐतिहासिक व वादळी बहुमत मिळवणाऱया अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे बळ किमान ५ जागांनी वाढून या पक्षाचे राज्यसभेत ८ खासदार होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT