Maharashtra Corona : sarkarnama
देश

Corona News : कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला : पण घाबरू नका, कारण..

Corona News : घाबरण्याचे कारण नाही, मात्र काळजी घ्यावी.

सम्राट कदम

पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने विळखा घातल्यानंतर त्यावर प्रभावी लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनोला आटोक्यात आणून या परिस्थितीवर मात करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. कोरोनाचा जिथून उगम झाला, त्या चीन मध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने कहर माजवलेले आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनकडून प्राथमिक स्तरावर आवश्यक खबरदारी व उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.

यापुढे आता संपूर्ण जगालाच कोरोनासोबत जगायचे आहे. मात्र याबाबत कसलीही अनावश्यक धास्ती आणि भीती बाळगण्याची गरज नाही. पण, तज्ञ आणि डॉक्टरांनी दिलेला सला घेणे आवश्यक. चीनमध्ये डोके वर काढलेल्या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटचे नाव ‘बीएफ.७' असे आहे. ‘बीएफ.७’व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक काळजी काय घ्यावी, याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा?

कोरोनाबाबत सध्याचे वास्तव :

- सद्या फक्त चीनमध्येच या आधीच्या कोरोनाच्या ओमिक्रॉनचाच, सब व्हेरीएंट म्हणजे ‘बीएफ.७’ या कोरोना व्हेरीएंटचे रूग्णसंख्या वाढली आहे.

- चीनकडून 'झीरो कोविड' धोरण आमलात आणल्यामुळे या नव्या व्हेरीएंटचा प्रभाव व प्रसार वाढला, असे अनेक कोविड असल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

- यापूर्वीच ऑक्टोबरमध्येच भारतात गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने या नव्या व्हेरीएंटने संक्रमित झालेल्या तीन रुग्णांची पुष्टी केली होती.

- या नव्या व्हेरीएंटने संक्रमित झालेले रूग्ण उपचारानंतर लवकर बरे झाले होते.

- ‘सेल होस्ट ॲण्ड मायक्रोब’या शोधपत्रिकेच्या संशोधनानुसार हा व्हेरीएंट फार धोकादायक वा हानी पोहचवणारा नाही.

- भारतात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या कोरोना संक्रमित यापूर्वीच झाली होती. तसेच भारतातील मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे प्राथमिक स्तरावर भारतात या व्हरिएंटबाबत सर्वांना संरक्षण आहे.

बी.एफ.७ या व्हेरिएंटबद्दल माहिती :

- या नव्या विषाणूच्या संक्रमणाचा दर आणि याबाबत होणाऱ्या आजाराच्या तीव्रतेबद्दल अजूनही शास्रीय विश्लेषण झालेले नाही.

- मोठ्या प्रमाणावर जनुकीय क्रमनिर्धारणानंतर शास्रीय विश्र्लेषणातून भारतातील परिस्थितीबगद्दल काही अंदाज बांधता येईल.

- देशातील लोकांचे जवळपास पूर्ण लसीकरण झालेले आहे. लोक बूस्टर आणि प्रिकॉशन डोसही घेत आहेत.

- सध्यातरी लोकांमध्ये सिरोपॉझीटीवीटी मोठ्या प्रमाणार आहे

- प्रत्येक राज्यात कोरोना विषाणूतील व्हेरिएंट तपासण्याची सुविधा आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण :

१) प्रहरी सर्वेक्षण : केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा जनुकीय क्रमनिर्धारण (जीनोम सिक्वेन्सिंग) करण्याबाबत निर्देश दिले गेले आहेत. महाराष्ट्रातदेखील यापूर्वीच एकूण पाच प्रयोगशाळा, सोहबच पाच रुग्णालयांची यासाठी निवड प्रहरी केंद्र म्हणून करण्यात आली होती. यातील प्रत्येक केंद्रात दर पंधरवड्याने १५ कोरोना बाधितांचे नमुने, जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस) यांना पाठविले जात होते. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू होत आहे.

२) सर्वोच्च विज्ञान संस्थेचा सहभाग :

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) यांच्या सहकार्याने विविध जीवशास्त्रीय प्रयोगशाळांमध्ये कोरोना संक्रमितांचे नमुने तपासले जातात. याद्वारे जिल्ह्यातून १०० नमुन्यांची तपासणी केली जाते.

आपण काय करू शकतो :

- लशीचा बूस्टर डोस तातडीने घ्यावा.

- गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, अंतर ठेवणे

- लक्षणे दिसल्यास तातडीने निदान करा

- घरात राहूनही कोरोना बरा होतो, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या

- अनावश्यक रूग्णालयात दाखल होणे टाळा.

किशोर आणि युवा वर्गाने घ्यावी काळजी :

- १२ ते १८ वर्गातील युवा वर्गाने लसीकरण पूर्ण करावे.

- शाळा अथवा महाविद्यालयात कोरोना संबंधीच्या पंचसूत्रीचे काटेकोर पालन करा.

- कोरोना संबंधीची लक्षण दिसल्यास तातडीने विलगीकरण आणि उपचार घ्या.

याबाबत महाराष्ट्र कोवीड टास्क फोर्सचे सदस्य व बालरोग तज्ज्ञ - डॉ. प्रमोद जोग म्हणाले की, "सध्या तरी देशात घाबरण्यासारखी स्थिती नाही. तरीही, ज्यांचे बुस्टर डोस राहीले आहेत. अशा सर्वांनी ते पुर्ण करावे. हे सर्व श्र्वसनमार्गाने पसरणारे विषाणू असून, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. सध्या तरी आपल्याकडे देशातील प्रसाराची माहिती नसल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासकीय माहितीचाच आधार घ्यावा. "

दरम्यान या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानभवनातील विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसुत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसुत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT