Petrol, Diesel Rates  sarkarnama
देश

खनिज तेल @100 डॉलर! पेट्रोल, डिझेल दरवाढीचा लवकरच उडणार भडका

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाने उच्चांकी पातळी गाठली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडाला आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 100 डॉलरवर पोचला आहे. यामुळे लवकरच पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडणार आहे. देशांतील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर मागील तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. निवडणुका संपताच जनतेला पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचे चटके बसणार आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 100 डॉलरवर गेला आहे. ही भावाची 2014 नंतरच्या उच्चांकी पातळी आहे. मागील वर्षी याच काळातील भावाच्या तुलनेत आता खनिज तेलाचा भाव 50 टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही विधानसभा निवडणुकांमुळे हे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरांचा भडका उडणार आहे. पेट्रोल प्रतिलिटर 125 रुपयांवर जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली. आज मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे. देशांतील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. गेल्या वर्षी देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

चालू वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला आगामी निवडणुकांत बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले होते. यामुळे केंद्र सरकारने आधी आणि नंतर भाजपसह विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT