Dattatreya Hosabale News Sarkarnama
देश

Dattatreya Hosabale : "...म्हणून भारत हिंदू राष्ट्रच,स्थापनेची गरज नाही!" : 'आरएसएस'चे सरकार्यवाह होसाबळेंचं सूचक विधान

Sachin Waghmare

Bhuj News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास आहे की, भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याची गरज नाही. भारत हे नेहमीच हिंदु राष्ट्र राहिले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज येथे संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारत (India) हिंदू राष्ट्र कधी होणार या प्रश्नाला उत्तर देताना होसाबळे म्हणाले, 'भारत हे पूर्वीपासून हिंदू राष्ट्र आहे आणि भविष्यातही असेच राहील. डॉ. हेडगेवार (आरएसएसचे संस्थापक) एकदा म्हणाले होते, जोपर्यंत या देशात हिंदू आहे, तोपर्यंत हा देश हिंदू राष्ट्र आहे. एक राष्ट्र म्हणून भारत होता, भारत आहे आणि भारत हिंदुराष्ट्र राहील, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या एकात्मतेची काळजी घेणे आणि समाजाच्या भल्यासाठी थोडा वेळ घालवणे हे हिंदुत्व आहे, असे होसाबळे म्हणाले. "भारत हे हिंदू राष्ट्र आहे, याची जाणीव लोकांना करून देण्याचे काम आरएसएस करते. अशा प्रकारे, हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची गरज नाही कारण भारत एक आहे. यावर आरएसएसचा विश्वास आहे, असेही होसाबळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

देशापुढील प्रमुख आव्हानांपैकी एक म्हणजे 'उत्तर विरुद्ध दक्षिण..' अशी विभागणी करण्याचे कारस्थान आहे . "काही लोक आता म्हणतात की दक्षिण भारत उत्तर भारतापेक्षा वेगळा आहे. राजकीय आणि बौद्धिक पातळीवर दक्षिणेला (उर्वरित भारतातून) तोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देशाला कमकुवत करण्याचा हा डाव आहे. याला विरोध करण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे आणि असे लोक यशस्वी होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असेही होसाबळे म्हणाले.

"सांस्कृतिक मार्क्सवाद आणि जागृतिवाद", ज्याचा उल्लेख आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी त्यांच्या विजयादशमी प्रसंगीच्या मार्गदर्शनामध्ये केला आहे. होसाबळे म्हणाले, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी, आरएसएसचे कार्यकर्ते 1 ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन मंदिराच्या भव्य उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे देशातील जनतेला निमंत्रण देणार आहेत.

आरएसएसच्या बैठकीत चर्चा करण्यात आलेला आणखी एक मुद्दा म्हणजे पाकिस्तानला लागून असलेल्या कच्छ जिल्ह्यातील गावांसह सीमावर्ती गावांतील हिंदूंचे स्थलांतर होत आहे. त्यावर होसाबळे म्हणाले. "आम्ही सीमावर्ती गावांचा विकास आणि सुरक्षेबाबत चर्चा केली. या गावांमधून सुविधांअभावी लोक इतरत्र स्थलांतरित होत आहेत. तेथे धार्मिक धर्मांतरणही होत आहेत. आम्ही या समस्यांवर लक्ष देत आहोत. सुरक्षेसाठी सीमेजवळ देशभक्त नागरिकांची उपस्थिती महत्त्वाची आहे.'

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT