NEET Exam Protest : नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपचारांमध्ये हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
जंतरमंतरवरून त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्याचा सरकारचा निर्णय मनमानी असल्याचे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
वांगचुक यांनी नीट परीक्षेतील (NEET Exam) कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ 28 जूनपासून जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषण सुरू असताना 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून हटवत सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
या कारवाईनंतर वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली जे. आंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Court) याचिका दाखल केली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन कुटुंबाच्या पसंतीच्या रुग्णालयात हलविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. या याचिकेवर रविवारी विशेष सुनावणी झाली.
मात्र, न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवत असून, त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेचा भंग होईल अशा प्रकारे त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली जात असल्याचे दिसत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने यापूर्वीच वांगचुक यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले होते. वांगचुक यांनी स्वतःहून कोणत्याही रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने, त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्याचा अधिकार सरकारला होता, असेही न्यायालयाने नमूद केले.
यामुळे वांगचुक यांच्यावरील उपचार सध्या सफदरजंग रुग्णालयातच सुरू राहणार असून, त्यांच्या पत्नीने केलेल्या रुग्णालय बदलाच्या मागणीला न्यायालयाने दिलासा दिलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.