Arvind Kejriwal, Atishi Sarkarnama
देश

Delhi Assembly Election : ‘लाडकी बहीण योजना’ वादात; सरकारनेच केली पोलखोल, आता राज्यपालांची ‘चाल’

Ladki Bahin Yojana Delhi controversy Delhi politics latest updates Congress versus Delhi government Delhi welfare schemes news : महिलांसाठी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत.

Rajanand More

New Delhi News : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने लाडक्या बहिणींसाठी जाहीर केलेल्या योजनेवरून वाद निर्माण झाला आहे. अशा कोणतीही योजनेला मंजुरी नसल्याचे सरकारमधील एका विभागानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारनेच आप आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची पोलखोल केल्याची चर्चा आहे. त्यातच आता काँग्रेसनेही नायब राज्यपालांकडे धाव घेत ‘आप’ला अडचणीत आणण्याची खेळी खेळली आहे.

केजरीवालांनी मागील आठवड्यात महिलांसाठी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचे अर्ज भरून घेण्यास सुरूवात झाल्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने बुधवारी याबाबत खुलासा केला आहे. या योजनेला कॅबिनेटने मंजुरी दिल्याचा दावा केजरीवालांनी केला होता. पण अशी कोणतीही योजना लागू केली नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

सरकारमधील एका विभागाच्या खुलाशानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. केजरीवालांविरोधात निवडणूकीला उतरलेले काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी याविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या विभागानेच या योजनेच्या नावावर कुणी अर्ज भरून घेत असेल तर तो घोटाळा असेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

हाच धागा पकडून दीक्षित यांनीही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, यापेक्षा मोठा घोटाळा असू शकत नाही. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला हे माहिती असायला हवे. जर आपचे सरकार आजच खोटे बोलत असेल तर दोन महिन्यांनी ते काय बोलतील, यावर कसा विश्वास ठेवायचा? जमा केलेल्या माहितीची गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आज याबाबत राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी महायुतीला साथ देत सत्तेत बसवले. पण आता दिल्लीतील योजना वादात अडकल्याने दिल्लीतील लाडक्या बहिणी केजरीवालांना धक्का देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. योजनेबाबत संभ्रम वाढला असून आता राज्यपाल काय भूमिका घेणार, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग काय पाऊल उचलणार, हेही महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT