Delhi municipal polls results : बिहार विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविलेल्या भाजपला दिल्लीत मोठा झटका बसला आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या १२ वॉर्डमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला आम आदमी पक्ष व काँग्रेसने जोरदार टक्कर दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा टिकवून ठेवण्यात भाजपला अपयश आले आहे.
दिल्ली महापालिकेच्या १२ वॉर्डसाठी ३० नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. २०२२ मध्ये २५० वॉर्डसाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह काही नगरसेवकांनी विधानसभेत एन्ट्री केल्याने पोटनिवडणूक झाली. मागील निवडणुकीत १२ वॉर्डपैकी ९ वॉर्डमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.
आजच्या निकालामध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपला १२ पैकी केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला आहे. मागील आकडाही भाजपला टिकविता न आल्याने हा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत आपने तीन जागांवर विजय मिळवून आपले गड शाबूत राखले.
निवडणुकीत काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. काँग्रेससाठी ही लॉटरी ठरली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. काँग्रेसला संगमविहार वॉर्डमध्ये विजय मिळाला आहे. काँग्रेस उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा ३ हजार मतांनी पराभव केला आहे. काँग्रेससाठी ही संजीवनी मानली जात आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता.
रेखा गुप्ता यांच्या शालीमार बाग बी वॉर्डमध्ये भाजपचा दणदणीत विजय जाला आहे. या वॉर्डमध्ये काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले. या वॉर्डमध्ये मुख्यमंत्र्यांचे गुप्ता यांचे निवासस्थान आहे. त्याशिवाय भाजपला विनोद नगर, द्वारका बी, अशोक विहार, ग्रेटर कैलाश, दिंचाऊं कला, चांदणी चौक या मतदारसंघात विजय मिळाला आहे. आपने मुंडका, दक्षिण पुरी आणि नारायणा वॉर्डमध्ये आपली ताकद दाखवून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.