CJP protest in Delhi latest news: दिल्लीत नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर दिल्ली पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. जंतर-मंतर परिसरात आंदोलन करत असताना एका महिला आंदोलकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना त्या ठिकाणच्या ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. मात्र, 22 जुलै रोजी आंदोलन अधिक तीव्र झाले. आंदोलकांना हटवताना पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर केला.
या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी एका महिला आंदोलकाला अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांनी जोरात कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला.
सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. याच दरम्यान समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा हे एका महिलेला कानाखाली मारताना स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात आला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचा मुद्दा बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयातही उपस्थित करण्यात आला.
वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयाचे लक्ष या घटनेकडे वेधत व्हायरल व्हिडिओमध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी महिलेला जोरात कानाखाली मारताना दिसत असल्याचे सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून योग्य कारवाई करण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.