Modi Government Delimitation : डिलिमिटेशन विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठी खेळी केल्याचे मानले जात आहे.
प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रस्तावामुळे लोकसभेतील राज्यांचा सध्याचा प्रतिनिधित्वातील टक्केवारीचा वाटा कायम राहण्याची शक्यता आहे.
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर दक्षिणेकडील राज्यांसह विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती. विशेषतः डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाने प्रत्येक राज्याचा लोकसभेतील सध्याचा प्रतिनिधित्वाचा वाटा कायम ठेवण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारने या मागणीशी संबंधित तरतूद मंजूर केल्याचे वृत्त असल्याने, विधेयकावरील मतदानावेळी या दोन्ही पक्षांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सध्या लोकसभेत (Lok Sabha) 543 जागा आहेत. प्रत्येक राज्यातील जागा 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव लागू झाल्यास लोकसभेतील एकूण जागांची संख्या 816 पर्यंत पोहोचू शकते. या नव्या व्यवस्थेत एकूण जागांपैकी एक तृतीयांश, म्हणजे सुमारे 272 जागा महिलांसाठी आरक्षित असण्याची तरतूद असल्याचे वृत्त आहे. ही व्यवस्था 2051 पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात संसदेत संबंधित विधेयक मंजूर झाल्यास, 2029च्या लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या जागांनुसार मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत लोकसभेतील जागांचे निर्धारण प्रामुख्याने लोकसंख्येच्या आधारावर होत आले आहे. ज्या राज्याची लोकसंख्या अधिक, त्या राज्याला लोकसभेत अधिक जागा, असे सूत्र राहिले आहे. उत्तर प्रदेशात सध्या सर्वाधिक 80 लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र, नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक राज्याच्या सध्याच्या लोकसभा जागांमध्ये समान प्रमाणात म्हणजे 50 टक्के वाढ केली जाणार आहे. त्यामुळे लोकसभेतील एकूण जागा वाढल्या, तरी प्रत्येक राज्याचा सध्याचा प्रतिनिधित्वातील टक्केवारीचा वाटा कायम राहू शकतो.
दक्षिण भारतातील राज्यांचा युक्तिवाद असा आहे की, त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर डिलिमिटेशन झाल्यास त्यांना लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू नये. जुन्या लोकसंख्या-आधारित सूत्रानुसार उत्तर भारतातील राज्यांच्या जागांमध्ये दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत अधिक वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे सध्याचा प्रतिनिधित्वातील वाटा कायम ठेवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
एप्रिलमध्ये चर्चेत आलेल्या विधेयकात प्रत्येक राज्याच्या लोकसभा जागांमध्ये समान प्रमाणात वाढ करण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ही मागणी लावून धरली होती. आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे वृत्त समोर आल्याने, विरोधकांच्या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विधेयकाच्या मतदानावेळी कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
डिलिमिटेशन विधेयकाला विरोध कायम ठेवणार की नव्या तरतुदींच्या पार्श्वभूमीवर भूमिका बदलणार, याबाबत उत्सुकता आहे. लोकसभेतील जागावाढीच्या प्रस्तावामुळे संसदेत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी मतदानाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.