Diwali celebration update : देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असली तरी महाराष्ट्राच्या अनेक भागांतील शेतकऱ्यांना मात्र दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यासोबतच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करत दिवाळी साजरी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची ही कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भावली आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियात पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे.
महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बालपांडे यांच्या घरी मुक्कामी असताना सोशल मीडियात पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, देशभरात दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे करपलेली पिके, निर्माण झालेली आर्थिक विवंचना, मुलांच्या शिक्षणाची चिंता त्यांच्या मनात आहे.
लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांशी या विषयांवर संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळताना अनुभवला. "साहेब, तुम्ही थेट आमच्या गावात आलात, आमच्या सुख-दुःखात सहभागी झालात, यातच आमचे अर्धे दुःख हलके झाले," हे त्यांचे शब्द मनाला स्पर्शून गेले.
माझ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे पीक म्हणजे केवळ उत्पादन नाही, तर ते त्याच्या संपूर्ण कुटुंबाने वर्षभर केलेल्या कष्टांचे, त्यागाचे आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. प्रत्येक पिकामागे कुटुंबाच्या भविष्याची आशा असते आणि प्रत्येक हंगामामागे समृद्धीचे स्वप्न असते. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे जेव्हा पीक उद्ध्वस्त होते तेव्हा शेतकऱ्यांच्या भविष्यावरही संकट येते. आज हे दुःख जवळून अनुभवले. म्हणूनच, केवळ मंत्रालयातील बैठका, निर्णय, योजना किंवा आर्थिक सहाय्यापुरते मर्यादित न राहता, बळीराजाच्या शेजारी बसून त्याच्या अडचणी जाणून घेणे, त्याचे अश्रू पुसणे आणि त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आधाराचा हात देणे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.