Dharmendra Kashyap BJP exit Sarkarnama
देश

former BJP MP quits : भाजपला जोरदार झटका; ज्या मातब्बर नेत्यासाठी मनेका गांधींचा मतदारसंघ बदलला, त्यांचीच पक्षाला सोडचिठ्ठी

Dharmendra Kashyap BJP exit, UP Assembly election 2027 : भाजपकडून उत्तर प्रदेशातील आठ नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. कश्यप यांचेही प्रयत्न सुरू होते. पण तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा होती.

Rajanand More

Uttar Pradesh politics : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला पहिला मोठा झटका बसला आहे. दोनवेळचे माजी खासदार, माजी कॅबिनेट मंत्री धर्मेंद्र कश्यप यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याबाबत त्यांनी बुधवारी घोषणा केली. कश्यप यांनी पक्ष सोडल्याने भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

धर्मेंद्र कश्यप यांनी मंगळवारी सोशल मीडियात 'टाटा बाय-बाय' अशी सूचक पोस्ट केली होती. तसेच आपल्या बायोमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो हटविला. त्यामुळे ते भाजप सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनीच याबाबत घोषणा केली आहे.

कश्यप यांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पक्षातील काहींनी आपल्याविरोधात काम केले. त्यांनाच मोठ्या पदांवर बसविण्यात आल्याने त्रास झाला. अशा लोकांना पक्ष काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे आमच्यासारख्यांना टाटा बाय-बाय म्हणावेच लागेल, अशी नाराजी कश्यप यांनी व्यक्त केली आहे.

भाजपकडून उत्तर प्रदेशातील आठ नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. कश्यप यांचेही प्रयत्न सुरू होते. पण तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा होती. त्यातूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कश्यप हे उत्तर प्रदशातील रुहेलखंड भागातील मातब्बर ओबीसी नेते मानले जातात. बरेली, आंवला, बदायूं आणि पीलीभीत भागातील कश्यप, बिंद, मल्लाह आणि निषाद समाजात त्यांचा वरचष्मा आहे. त्यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे भाजपला महागात पडू शकते.

कश्यप हे मुळचे समाजवादी पक्षातील असून ते दोनदा आमदार, एकदा मंत्री आणि दोनदा लोकसभेचे खासदार होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी ते सपाला रामराम ठोकत भाजपमध्ये आले होते. भाजपने त्यांना आंवला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. २०१९ मध्येही त्यांनी पुन्हा विजय मिळविला. मात्र, २०२४ मध्ये त्यांना विजय मिळविता आला नव्हता.

मनेका गांधी, वरुण गांधींचा मतदारसंघ बदलला

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी कश्यप यांना आंवलामधून तिकीट देण्यात आले होते. हा मतदारसंघ त्यावेळी मनेका गांधी यांचा होता. कश्यप यांच्यासाठी मनेका गांधी यांचा मतदारसंघ बदलून पीलीभीतमध्ये उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी पीलीभीतमध्ये खासदार राहिलेल्या वरुण गांधी यांना सुलतानपूरमध्ये पाठविण्यात आले होते. सध्या आंवलामध्ये समाजवादी पक्षाचे वर्चस्व आहे. यापार्श्वभूमीवर कश्यप हे समाजवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT