CJP Protest_Saurav Das, Ashutosh Ranka_Minister JP Nadda, Jitendra Singh 
देश

Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांची विकेट पडणार? दोन दिवसांत होणार फैसला, CJPच्या प्रवक्त्यांची सरकारसोबत झाली चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

Dharmendra Pradhan: आज सरकारसोबत सीजेपीच्या सदस्यांची दिल्लीतील कॉस्टिट्युशन क्लबमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत दोन प्रमुख मागण्या सरकारनं मान्य केल्या. पण अद्याप शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय झालेला नाही.

Amit Ujagare

Dharmendra Pradhan: आज सरकारसोबत सीजेपीच्या सदस्यांची दिल्लीतील कॉस्टिट्युशन क्लबमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत दोन प्रमुख मागण्या सरकारनं मान्य केल्या. पण अद्याप शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय झालेला नाही. पण येत्या दोन दिवसांचा अल्टिमेटम सीजेपीच्या नेत्यांनी सरकारला दिला आहे. जोपर्यंत प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींसमोर मांडली.

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका हे दोघे दुसऱ्यांदा बैठकीसाठी गेले होते. आजच्या बैठकीत त्यांनी आपल्या मागण्या लिखित स्वरुपात सरकारला सोपवल्या. बैठक पार पडल्यानंतर आशुतोष रांका यांनी सांगितलं की, सरकारशी आमची १० मिनिटं चर्चा झाली. आम्ही सरकारपुढे तीन मागण्या ठेवल्या. NEET परीक्षा रद्द झाल्यामुळं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी. तसंच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. पण धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत अद्याप सहमती होऊ शकली नाही.

त्यामुळं उद्या सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ सरकारनं आमच्याकडं मागितली आहे. आम्हाला आशा आहे की सरकार प्रधान यांना लवकरात लवकर पदावरुन दूर करतील. सरकारनं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हे आणि कायदेशीर मागण्या परत घेण्याच्या मागणीला तत्वतः मंजुरी दिली आहे.

दरम्यान, सीजेपीचे संस्थापक आणि समन्वयक अभिजीत दिपके यांनी सरकारच्या या भेटीवर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माघार नाही ही ठाम भूमिका बोलून दाखवली. आपला विजय दृष्टीपथात आला असल्याचं त्यांनी जंतर-मंतरवर आंदोलक तरुणांना उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर केलं आहे. त्यामुळं आंदोलक तरुणांमध्येही या क्षणी मोठा उत्साह दिसून आला. याचा परिणाम म्हणून दिल्लीतल्या आंदोलनस्थळी तरुणांची गर्दी वाढतानाच दिसत आहे. दिपकेंना आणि सीजेपीला दिवसेंदिवस तरुणांचा भक्कम पाठिंबा मिळताना दिसतो आहे.

दुसरीकडं आज पुण्यात शनिवार वाडा इथं तरुणांनी हातात धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यांचे फलक घेऊन जोरदार आंदोलन केलं. भर पावसात छत्र्या आणि रेनकोटसह मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. तसंच मुंबईतही शिवाजी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर जेनझी मंडळी एकवटली आहेत. या ठिकाणीही जोरदार आंदोलन सुरु असून हातात फलक घेऊन, गाणी म्हणत आणि उत्स्फुर्तपणे तरुण दाखल होत आहेत. मुंबईतल्या या आंदोलनाला ठाकरे बंधुंकडून पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे तसंच खासदार संजय राऊत यांनी देखील शिवाजीपार्कमध्ये जाऊन तरुणांचा उत्साह वाढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT