Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisis  Sarkarnama
देश

श्रीलंकेत डिझेल संपलं! वाहतूक व्यवस्था ठप्प अन् देश बुडाला अंधारात

सरकारनामा ब्युरो

कोलंबो : श्रीलंकेत (Sri Lanka) मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून, अर्थव्यवस्था (Economy) डबघाईला आली आहे. देशातील डिझेलचा (Diesel) साठा संपला असून, देशातील 2.2 कोटी जनता सध्या अंधारात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे हे सर्वांत मोठे आर्थिक अरिष्ठ्य ओढवले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठीही सरकारने परकी चलन शिल्लक उरलेले नाही. तसेच, वीज टंचाईमुळे कोलंबो शेअर बाजाराच्या कामकाजाची वेळही अडीच तासाने कमी करण्यात आली आहे. (Sri Lanka Crisis News)

श्रीलंकेत डिझेल संपल्यामुळे विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे बस आणि व्यावयासिक वाहने बंद आहेत. पेट्रोलची विक्री सुरू असली तरी पुरवठा कमी आहे. यामुळे नागरिक पेट्रोल पंपाबाहेरील मोठ्या रांगातच कार सोडून जात असल्याचे चित्र आहे. श्रीलंकेचे परिवहन मंत्री दिलुम अमुनुगामा यांना दिलेल्या माहितीनुसार, गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसमधील डिझेल काढून ते इतर वाहनांसाठी वापरले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत खासगी बसचे प्रमाण दोन तृतीयांश आहे. डिझेल संपल्यामुळे या सर्व बस बंद आहेत.

उद्यापासून देशात 13 तास भारनियमन केले जाणार आहे. कारण जनरेटरसाठी डिझेलच शिल्लक नाही. वीजनिर्मिती कंपनीला दोन दिवसात डिझेल पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर भारनियमन कमी करण्यात येईल. याचबरोबर जलविद्युतनिर्मिती सुरू असलेल्या जलाशयांची पातळी कमी झाली आहे. यामुळे मोठी वीजसंकट निर्माण झाले आहे. याचबरोबर कोलंबो शेअर बाजाराचे कामकाजही अडीच तासांनी कमी करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

श्रीलंकेत हजारो लोकांना पेट्रोलची (Petrol) खरेदी करण्यासाठी अनेक तास पेट्रोल पंपासमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. देशाकडे पुरेशा प्रमाणात परकी चलनाचा साठा नसल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवरही निर्बंध आले आहेत. या महिन्यात सुरूवातीपासूनच देशात सात तास भारनियमन केले जात होते. आता भारनियमनाचा कालावधी वाढवून 13 तास करण्यात आला आहे. देशात साडेसातशे मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारच्या मालकीच्या सेलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपनीने वाहनचालकांना इंधनासाठी पेट्रोल पंपांबाहेर रांगा न लावण्याचे आवाहन केले आहेत. यामुळे श्रीलंका सरकारने परदेशातून पेट्रोल आणि डिझेल मागविले आहे. परंतु ते नेमके कधी येईल हे मात्र स्पष्ट नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT