Indian Hockey Saffron Jersey Sarkarnama
देश

Dilip Tirkey Hockey India Jersey Controversy : भारतीय हॉकीच्या भगव्या जर्सीवरून नवा वाद; अध्यक्ष दिलीप तिर्कींचाच सवाल, 'निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले नाही'

Dilip Tirkey questions Hockey India jersey decision process : पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी वापरण्याच्या निर्णयावरून हॉकी इंडियातच मतभेद; कार्यकारिणीला डावलल्याचा आरोप, लेखी स्पष्टीकरणाची मागणी

Pradeep Pendhare

Indian Hockey Team : आगामी हॉकी विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघाची पारंपरिक निळी जर्सी बदलून भगव्या रंगाची जर्सी वापरण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

या निर्णयावर आता हॉकी इंडियाचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप तिर्की यांनीच गंभीर आक्षेप नोंदवला आहे. जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय घेताना स्वतःला किंवा हॉकी इंडियाच्या कार्यकारिणीतील सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणी दिलीप तिर्की यांनी हॉकी इंडियाच्या (India) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकारिणी सदस्यांना ई-मेल पाठवत निर्णय प्रक्रियेबाबत लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. राष्ट्रीय संघाच्या जर्सीचा रंग आणि संघाची ओळख यासारख्या संवेदनशील विषयांवर निर्णय घेण्यापूर्वी निवडून आलेल्या नेतृत्वाशी चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिलीप तिर्की यांनी आपल्या ई-मेलमध्ये स्पष्ट केले की, त्यांचा आक्षेप भगव्या रंगाला नसून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कार्यकारिणीशी चर्चा न करता जर्सीचा रंग बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, राष्ट्रीय संघाची (Sport) ओळख आणि देशाचे प्रतिनिधित्व यांच्याशी संबंधित निर्णय अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे अशा निर्णयांमध्ये संबंधित नेतृत्वाला विश्वासात घेणे आवश्यक आहे.

भारतीय हॉकी संघाची ओळख अनेक वर्षांपासून पारंपरिक निळ्या जर्सीशी जोडली गेली आहे. तिर्की यांच्या म्हणण्यानुसार, जर्सीचा रंग बदलण्यापूर्वी खेळाडूंशीही कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती. नवीन भगवी जर्सी समोर आल्यानंतरच हा बदल झाल्याची माहिती अनेकांना मिळाली.

माजी खेळाडू अन् राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया

जर्सीचा रंग बदलण्याच्या निर्णयानंतर माजी हॉकीपटू, क्रीडाप्रेमी आणि राजकीय क्षेत्रातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचे माजी कर्णधार आणि ऑलिम्पियन विरेन रसकिन्हा तसेच ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ओडिशा सरकारनेही मागितले स्पष्टीकरण

दिलीप तिर्की यांच्या माहितीनुसार, ओडिशा सरकारनेदेखील या निर्णयाबाबत हॉकी इंडियाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला, तो कोणत्या प्रक्रियेनुसार मंजूर झाला आणि त्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी तिर्की यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर मागितले असून, या उत्तराकडे आता संपूर्ण क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न

जर्सीच्या रंगावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ रंगापुरता मर्यादित राहिलेला नाही. हॉकी इंडियामधील निर्णय प्रक्रिया, पारदर्शकता आणि प्रशासकीय पद्धतीवरही या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, यावर पुढील घडामोडी अवलंबून असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT