नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी त्यांनी दिल्लीत भाजपचे (BJP) नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, अशा चर्चा सुरू होत्या. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समोर आलं आहे.
कॅप्टन यांनी बुधवारी दिल्लीत अमित शहांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याचे समजते. 'मी कोणत्याही राजकारणाला भेटायला आलेलो नाही. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान कपूरथळा हाऊस हे रिकामे करण्यासाठी मी आलो आहे, असे अमरिंदरसिंग मंगळवारी दिल्लीत आल्यानंतर म्हणाले होते. पण बुधवारी त्यांनी शहांची भेट घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला.
अमरिंदरसिंग यांच्या माध्यम सल्लागारांनी दोघांमधील भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. 'गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. कृषी कायद्यांविरोधात लांबलेल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली. तसेच या आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती त्यांना केली. कायदे मागे घेण्यासह किमान आधारभूत किंमतीची हमी या मागण्याही केल्या आहेत,' असं सल्लागारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, लवकरच कॅप्टन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल, असेही बोलले जात आहे. कारण केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना सर्वाधिक विरोध पंजाबमधून होत आहे. मुख्यमंत्रिपद गमावलेले कॅप्टन हे काँग्रेसवर नाराज आहेत. राज्यात भाजपचा फारसा प्रभाव नाही. यातच कॅप्टन भाजपमध्ये आल्यास राज्यात विस्तार करण्यास पक्षाला मोठा वाव मिळेल. याचबरोबर त्यांनी केंद्रात कृषी मंत्रिपद दिल्यास पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधाची धारही काहीशी कमी होईल, असा भाजपचा कयास आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.